रियाध : येमेनमधील हौथी बंडखोरांचे सौदीवर ड्रोन हल्ले

रियाध : येमेनमधील हौथी बंडखोरांनी आज सौदी अरेबियामधील विविध प्रकल्पांवर ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यांमुळे जीवित हानी झाली नसली तरी वाहनांचे आणि घरांचे नुकसान झाल्याचे सौदी सरकारने सांगितले. सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीतर्फे येमेनमध्ये हौथी बंडखोरांविरोधात लढाई सुरु आहे. यामुळे हौथी बंडखोरांनी आज अनेक ड्रोन विमानांद्वारे सौदी अरेबियातील द्रवरूप नैसर्गिक वायू प्रकल्प, जलशुद्धीकरण प्रकल्प, तेल वितरण केंद्र आणि वीज केंद्रावर हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये काही वाहने जळाली, तर काही घरांचे नुकसान झाले. प्रकल्पांची कोणतीही हानी झाली नाही. येमेनमध्ये गेल्या सात वर्षांपासून संघर्षग्रस्त स्थिती असून सध्या शांतता चर्चाही थंडावली आहे. येमेनमधील हौथी बंडखोरांना इराणचे पाठबळ आहे. येमेनमधील बंडखोरांनी प्रकल्पांवर केलेले हल्ले उधळून लावल्याचा दावा सौदीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. हल्ला झालेल्या प्रकल्पांपैकी दोन प्रकल्प अरमॅको या जगातील बड्या तेल उत्पादन कंपनीच्या मालकीचे आहेत. ही सरकारी कंपनी आहे. जागतिक बाजारपेठेत तेल पुरवठ्यात झालेली घट, तेलाच्या वाढत्या किमती आणि कोरोना संसर्गातून सावरलेल्या अर्थव्यवस्था यामुळे २०२१ या आर्थिक वर्षात अरमॅको कंपनीने १२४ टक्के फायदा मिळवत ११० अब्ज डॉलरची कमाई केली आहे. त्रयस्थ देशात चर्चा हवी येमेनमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी आखाती देशांच्या संघटनेने हौथी बंडखोरांच्या नेत्यांना चर्चेसाठी सौदीची राजधान रियाधमध्ये येण्याचे अनेकवेळा आमंत्रण दिले आहे. मात्र, त्रयस्थ देशात चर्चा व्हावी, या मागणीवर बंडखोर ठाम असल्याने अद्याप शांतता चर्चेला यश आलेले नाही. येमेनमधील मारिब हे तेलसंपन्न शहर ताब्यात घेण्याचा बंडखोरांनी प्रयत्न केल्यापासून चर्चा यशस्वी होण्याची आशाही कमी झाली आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply