Vande Bharat Express : पुण्याहून धावणाऱ्या ‘वंदे भारत’ला वर्षाने मिळणार गती

पुणे - पुण्याहून धावणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसची गती वाढण्यास प्रवाशांना किमान एक वर्ष तरी वाट पाहावी लागणार आहे. कारण, लोणावळा-पुणे लोहमार्गावरील ओव्हरहेड वायरच्या खांबाला एटीडी (ऑटोमेटेड टेन्शन डिव्हाइस) लावण्याचे काम सुरू झाले असून ते पूर्ण होण्यासाठी वर्षाचा कालावधी लागणार आहे. हे काम जोपर्यंत पूर्ण होणार नाही, तोपर्यंत वंदे भारत एक्स्प्रेस लोणावळा ते पुणे सेक्शनमध्ये ताशी ११० किलोमीटर वेगानेच धावेल.

मुंबई-पुणे-सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या या गाडीचा वेग ११० किमी प्रति तास आहे. या गाडीची धावण्याची क्षमता ताशी १६० किमीची आहे. मात्र पुणे विभागात अपुरे असलेले ‘एटीडी’चे काम तसेच ट्रॅक अपग्रेड होऊनदेखील परवानगी नसल्याने अद्याप वंदे भारत एक्स्प्रेस ताशी ११० किमी वेगानेच धावणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसमुळे प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळत आहे. मात्र त्यांच्या प्रवासाच्या वेळेत फारशी बचत होत नाही. ताशी १३० किमी वेगाने धावल्यास प्रवासाचा वेळ निश्चितच कमी होणार आहे. मात्र त्यासाठी प्रवाशांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

‘ओएचई’साठी मेटलच्या वायरचा वापर केला जातो. उन्हाळ्यात तापमान वाढल्यावर या वायर प्रसरण पावतात. तर हिवाळ्यात थंडीमुळे आकसले जातात. वायरचे प्रसारण झाले तर पेंटोग्राफ तुटण्याची शक्यता अधिक असते. जर वायर आक्रसली तर ती तुटण्याची भीती असते. हे सर्व टाळण्यासाठी रेल्वे मास्टच्या दोन्ही बाजूला ‘टेन्शन’ म्हणजे ११०० किलोचे वजन लटकून ठेवते. यामुळे उन्हाळा व हिवाळा या दोन्ही स्थितीत वायरला कोणताच धोका निर्माण होत नाही. पुणे-लोणावळा दरम्यान रेल्वेने हेच ‘टेन्शन’ न ठेवल्याने पुणे रेल्वेला आता ‘टेन्शन’ आले आहे.

‘ओएचई’च्या कॅटनरी व कॉन्टॅक्ट वायर या सरळ व ताट राहण्यासाठी ‘टेन्शन’ दिले जाते. यासाठी पोलच्या दोन्ही बाजूला ६६५ किलो वजनाचे काउंटर वेट (मेटलचे प्लेट) ठेवण्यात येते. यासह पुलाचा देखील वापर होतो. प्लेट व पुली मिळून एका बाजूला ११०० किलोचे वजन तयार होते. दोन्ही बाजूला २२०० किलोचे वजन निर्माण झाल्याने ओव्हरहेड वायर सरळ व ताट राहण्यास मदत होते. परिणामी, पेंटोग्राफ सुरक्षित राहून गाडीची गती वाढण्यास मदत होते.

 

पुणे-लोणावळा दरम्यान ऑटोमेटेड टेन्शन डिव्हाईस बसविण्याचे काम सुरु झाले आहे. हे काम पूर्ण होताच रेल्वे ताशी १३० किमी वेगाने धावेल. हे काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

- इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे

‘वंदे भारत’चे स्पीड ब्रेकर....

  • मुंबई ते सोलापूर ४५३ किमीचा मार्ग आहे. यात मुंबई विभागात सुमारे १०० किमीचा मार्ग हा उपनगरीय आहे. या भागात लोकलची संख्या जास्त आहे. दर दोन मिनिटांनी लोकल धावते.

  • कर्जत ते लोणावळा हा २८ किमीचा घाट सेक्शन आहे. यात रेल्वेची गती कमालीची कमी होती. गाडी ५५ किमीने धावते.

  • लोणावळा ते पुणे दरम्यान ‘ओव्हरहेड’ वायरच्या खांबाला टेन्शन नाही.

  • पुणे ते दौंडदरम्यान ट्रॅक अपग्रेड; मात्र अद्याप परवानगी नाही.

  • दौंड ते सोलापूरदरम्यान ट्रॅक अपग्रेडचे काम सुरू. पूर्ण होण्यास काही दिवसांचा अवधी लागणार.

रेल्वेचे दुर्लक्ष; प्रवाशांना फटका

पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या विद्युतीकरणानंतर २००८ मध्ये ओएचईचे (ओव्हरहेड) डीसी (डायरेक्ट करंट) ते एसी (अल्टरनेट करंट) मध्ये रूपांतर झाले. मात्र, ते काम अपुरे झाले. त्या वेळी विद्युतीकरणाच्या खांबाला (पोल) एटीडी (ऑटोमेटेड टेन्शन डिव्हाईस) जोडणे आवश्यक होते. मात्र रेल्वेने त्यावेळी दुर्लक्ष केले. त्याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे. एटीडी नसल्याने रेल्वेचा वेग वाढविला जात नाही. ‘ओएचई’च्या कॅटनरी व कॉन्टॅक्ट वायरला जोडून ठेवणारे ‘टेन्शन’ नाही. आता पुणे रेल्वे प्रशासन खांबाला टेन्शन लावण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, हे काम पूर्ण होण्यास अजूनही वर्ष लागण्याची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply