पुणे : सारसबागेत वॅाकिंग प्लाझा करण्याचे विचाराधीन; हमीपत्रानंतरच सारसबाग, तुळशीबागेतील स्टॅालधारकांना परवानगी

सारसबाग येथील स्टॅालधारकांनी स्टॅालवरील शेड काढाव्यात आणि खुर्च्या हटवून रस्ता मोकळा करावा, अशा अटी-शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र दिल्यानंतरच सारसबागेतील खाद्यपदार्थांचे स्टॅाल सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी घेतला आहे. सारसबागेत वॅाकिंग प्लाझा करण्याचेही विचाराधीन आहे. त्यामुळे नियम आणि अटींबाबत हमीपत्र दिल्यावरच सारसबाग, तुळशीबाग आणि बिबवेवाडीतील स्टॅाल्स सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सारसबाग येथील खाद्यपदार्थांच्या स्टॅालवर कारवाई करत स्टॅाल सील केले आहेत. रस्त्यावर टाकण्यात आलेल्या टेबल आणि खुर्च्या जप्त करण्यात आल्या असून शेड काढून टाकण्यात आले आहेत. त्यापूर्वी गेल्या आठवड्यात अधिकृत परवाना शुल्काची थकीत रक्कम न भरल्यामुळे तुळशीबागेतील २२१ स्टॅालधारकांवर कारवाई करून स्टॅाल बंद करण्यात आले आहेत. तर बिबवेवाडी परिसरातील स्वामी विवेकानंद रस्त्यावरील स्टॅालचे बेकायदा गाळ्यांमध्ये रुपांतर करण्यात आल्याने ५१ गाळे सील करण्यात आले आहेत.

सारसबाग, तुळशीबाग आणि बिबवेवाडी येथील स्टॅालधारकांवर कारवाई केल्याचे तीव्र पडसाद उमटले होते. पथारी व्यावसायिक संघटनांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने स्टॅालधारकांना व्यवसाय सुरू करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र अटी-शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र दिल्यावरच व्यवसाय सुरू करण्यास मान्यता देण्याची भूमिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी घेतली आहे. हमीपत्र दिल्यानंतर नियमांचे उल्लंघन केल्यास व्यवसाय करण्याचा परवाना रद्द करण्याचेही निश्चित करण्यात आले आहे. सारसबाग येथे वॅाकिंग प्लाझा करण्याचे महापालिकेच्या विचाराधीन आहे, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

बिबवेवाडी येथील गाळे नियमित करण्याबाबत कायदेशीर प्रक्रियेची माहिती घेतली जाणार आहे. कायद्यानुसार नियमित होणा-या गाळ्यांवर कारवाई केली जाणार नाही. मात्र बेकायदा गाळ्यांवर कारवाई केली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यत थकबाकी भरून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे, अशी माहिती अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply