T20 World Cup 2022 Points Table : पाकिस्तानला हरवल्यानंतर भारताचे सेमिफायनलचे दार थेट उघडले, पाहा काय आहे गणित?

मुंबई : टीम इंडियाने (Team India) टी २० वर्ल्डकप स्पर्धेत धमाकेदार सुरुवात केली आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर चार विकेट राखून रोमहर्षक विजय मिळवला.

सुपर १२ मध्ये प्रत्येक संघाला पाच सामने खेळायचे आहेत. दोन्हीही गटांतून केवळ दोन-दोन संघ सेमिफायनलमध्ये जाणार आहेत. अशावेळी पॉइंट टेबल खूपच महत्वपूर्ण आहे. भारताच्या बाबतीत सांगायचे झाले तर, अद्याप चार सामने खेळायचे आहेत. तर सेमिफायनलमध्ये पोहोचण्यासाठी सहा गुण आणखी हवे आहेत. अन्य संघांची गुणतालिकेतील स्थिती जाणून घेऊयात.

ग्रुप २ मधील संघांबाबत सांगायचे झाले तर, बांगलादेश संघाने पहिल्या सामन्यात नेदरलँडचा पराभव केला आहे. त्यांचा नेट रनरेट ०.४५० आहे. तर भारताचा ०.०५० आहे. बांगलादेशचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहे. तर भारतीय संघ दुसऱ्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करावा लागला.

हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. पाकिस्तानी संघ पाचव्या स्थानी आहे. तर नेदरलँडचा संघ सहाव्या स्थानी आहे. आता भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला नाही तरी सेमिफायनलमध्ये पोहोचू शकतो. त्यांना सहा गुणांची आवश्यकता आहे.

२७ तारखेला नेदरलँडशी टक्कर

भारताचा दुसरा सामना २७ ऑक्टोबर रोजी नेदरलँडविरुद्ध होणार आहे. भारताने जर नेदरलँड, बांगलादेश आणि झिम्बाब्वे या तिन्ही संघाविरुद्ध विजय मिळवला तर, सेमिफायनलमध्ये सहज प्रवेश होईल. भारताचे आठ गुण होतील. दक्षिण आफ्रिका उर्वरित चार सामने जिंकला तरी, त्यांचे नऊ गुण होतील. तर पाकिस्तान दक्षिण आफ्रिका विरुद्ध पराभूत झाला आणि अन्य संघांविरुद्ध विजय मिळवला तर, त्यांचे सहाच गुण राहतील. दक्षिण आफ्रिका पाकिस्तानकडून पराभूत झाला तर, तसेच अन्य संघांना हरवलं तरी त्यांचे सात गुण होतील.

पाकिस्तान जर सर्व चार सामने जिंकला तर, त्यांचे आठ गुण होतील. अशावेळी टीम इंडिया जर चार सामन्यांपैकी तीन सामने जरी जिंकला तरी, अगदी आरामात सेमिफायनलमध्ये प्रवेश करील.

चॅम्पियन ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत सर्वात शेवटी

ग्रुप १ बाबत सांगायचे झाले तर, गतविजेता ऑस्ट्रेलिया संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडने ८९ धावांनी पराभूत केले आहे. न्यूझीलंड पहिल्या, श्रीलंका दुसऱ्या आणि इंग्लंडचा संघ तिसऱ्या स्थानी आहे.

श्रीलंकेने आयर्लंडला, तर इंग्लंडने अफगाणिस्तानला पराभूत केले आहे. आता या गटातील सर्वात मोठी लढत ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणार आहे. जर ऑस्ट्रेलियाचा आज पराभव झाला तर, सेमिफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशांवर पाणी फेरू शकते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply