Solapur News : एकाला वाचवायला गेले अन् चौघेही बुडाले; भीमा नदीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Solapur Crime  : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. तालुक्यातील सिद्धापूर येथील भीमा नदीच्या पात्रामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. गुरूवारी (१३ एप्रिल) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये दोन लहान मुले आणि दोन महिलांचा समावेश आहेत. या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त होत आहे. 

बालूदमाई करणसिंग नेपाळी (वय ३५ वर्ष),मनसरादमाई महेंद्रसिंग नेपाळी (वय ३३ वर्ष), हिरदेश महेंद्रसिंग नेपाळी (वय ८ वर्ष), नमुना करणसिंग नेपाळी (वय ११ वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. हे चारही जण जम्बुकांध, तालुका जिल्हा द्रेलेख राज्य, कर्णाली प्रदेश, नेपाळ देशातील आहेत.

प्राप्त माहितीनुसार, नेपाळ देशातील गुरखे उपजीविकेसाठी रात्रीचे गस्त घालण्यासाठी देशभर फिरत असून मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर गावांमध्ये सहा दिवसापूर्वी आले होते. सिद्धापूर गावात एक भाड्याने घर घेऊन ही दोन कुटुंबे राहत होती.

आज सायंकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे या गुरखा कुटुंबातील महिला कपडे धुण्यासाठी नजीकच्या भीमा नदीवर गेल्या होत्या. त्यांच्या सोबत लहान मुलेही होती. नदीच्या काठी खेळत खेळत पाण्यात गेली. परंतु नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असताना महिलांच्या लक्षात आले. 

मुलांचे प्राण वाचविण्यासाठी दोन महिलांनी पाण्यात उड्या मारल्या आणि मुलांसह या महिलाही वाहून गेल्या. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठले. गावातील तरुणांनी नदीत उतरुन या चौघांचाही शोध घेतला. मात्र, कुणीही मिळून आलं नाही.

दरम्यान, गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत सायंकाळी उशिरापर्यंत बुडालेल्या चार जणांचा शोध घेतला. बेशुध्दावस्थेत सर्वांना बाहेर काढून रूग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी चौघांनाही मृत घोषित केलं. या घटनेनं मंगळवेढा तालुक्यातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply