Shraddha Murder Case: “ “देशाकडे आज एक शक्तीशाली नेतृत्व, नेता नसेल, देशाला आई मानणारं सरकार नसेल तर प्रत्येक शहरात आफताब जन्माला येईल”; भाषणात ‘लव्ह-जिहाद’चा उल्लेख करत BJP च्या मुख्यमंत्र्यांचं विधान

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी श्रद्धा वालकर प्रकरणाचा उल्लेख एका जाहीर सभेमध्ये केला आहे. शर्मा यांनी श्रद्धा वालकर खून प्रकरण हे ‘लव्ह-जिहाद’चं प्रकरण असल्याचा दावा केला आहे. आज आपल्या देशामध्ये सक्षम नेतृत्व नसेल, देशाची आईप्रमाणे काळजी घेणारं सरकार नसेल तर असे आफताब प्रत्येक शहरामध्ये तयार होतील, असं शर्मा यांनी म्हटलं आहे. तसेच असं झालं तर आपण आपल्या समाजाची सुरक्षा करु शकणार नाही अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

“आफताबने श्रद्धाला मुंबईवरुन घेऊन आला आणि लव्ह-जिहादच्या नावाखाली ३५ तुकडे केले तिच्या मृतदेहाचे. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला. मृतदेह फ्रिजमध्ये होता त्याचवेळेस तो दुसऱ्या मुलीला घेऊन आला आणि डेटींग करु लागला,” असं शर्मा यांनी या प्रकरणासंदर्भात म्हटलं आहे. “देशाकडे आज एक शक्तीशाली नेतृत्व, नेता नसेल, देशाला आई मानणारं सरकार नसेल तर प्रत्येक शहरामध्ये असा आफताब जन्माला येईल. आपण आपल्या समाजाची रक्षाही करु शकणार नाही,” असं शर्मा यांनी म्हटलं.

श्रद्धा वालकरच्या हत्येचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या पथकाने गुरुग्राममधील एका खासगी कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली. येथे आरोपी आफताब पूनावाला काम करत असे, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. येथे झडती घेतल्यानंतर कार्यालयाच्या परिसरातील झुडपांतून जप्त केलेल्या वस्तू पोलीस एका प्लॅस्टिक पिशवीतून घेऊन जाताना दिसले. मात्र त्याचा तपशील पोलिसांनी सांगितला नाही.  आफताब आणि श्रद्धा मुंबईहून दिल्लीत स्थलांतरित झाल्यानंतर आरोपी खासगी कंपनीत काम करत असे, त्यांनी सांगितले.  पुढील काही दिवसांत पूनावालाला हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि इतर ठिकाणी तपासासाठी नेले जाईल.

नवी दिल्लीतील साकेत जिल्हा न्यायालयाने गुरुवारी आफताब पूनावालाला पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. काही प्रश्नांबाबत त्याची चौकशी करायची असल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला. त्याची नार्को चाचणी करण्यासही परवानगी देण्यात आल्याचे न्यायालयाने सांगितले.

श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी अटकेत असलेला आरोपी आफताब पूनावाला याच्याविरोधात वकिलांच्या एका गटाने गुरुवारी सायंकाळी नवी दिल्लीतील साकेत जिल्हा न्यायालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली.  आरोपीला महानगर दंडाधिकारी अविरल शुक्ला यांच्यासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच साकेत जिल्हा न्यायालयातील सुमारे १०० वकिलांनी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास न्यायालयाच्या आवारात गर्दी केली. 

पोलीस कोठडीत असलेल्या आफताबला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘आरोपीने भयंकर आणि मानवतेला काळिमा फासणारा गुन्हा केला असल्याने त्याच्याविरोधात आम्ही घोषणाबाजी केली. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यात यावा आणि जलदगती न्यायालयात लवकर निर्णय घेण्यात यावा,’ असे आंदोलक वकिलांनी सांगितले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply