Shivneri Bus : बस चालवताना मोबाईलवर क्रिकेटचा सामना पाहणं पडलं महागात, बस चालकावर झाली मोठी कारवाई

Mumbai Pune E Shivneri Bus : एका बस चालकाला बस चालवताना मोबाईलवर क्रिकेटचा सामना पाहणं चांगलचं महागात पडलं आहे. या बस चालकावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) मोठी कारवाई केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची दखल राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली होती. त्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर बस चालकाला थेट बडतर्फ करण्यात आलं आहे.

मुंबई ते पुणे महमार्गावर ही ई-शिवनेरी बस जात होती. या बसमधून अनेक प्रवासी प्रवास करत होते. मात्र, बस चालक बस चालवताना बेशिस्तपणे मोबाईलवर क्रिकेटचा सामना पाहत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भातील एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर याची दखल मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आणि कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या संदर्भातील वृत्त जागरणने दिलं आहे.

Pune : पुण्यातील मंत्री असूनही ‘ससून’चा कारभार अधांतरीच!

ई-शिवनेरी बसवरील हा चालक खासगी असल्याची माहिती सांगितली जाते. या चालकाला बडतर्फ करण्याची कारवाई केल्यानंतर संबंधित खासगी कंपनीला देखील ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई ते पुणे या महमार्गावर धावणाऱ्या या ई-शिवनेरी बस चालकाचा क्रिकेट पाहतानाचा व्हिडीओ एका प्रवाशाने काढला होता. त्यानंतर हा व्हिडीओ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवण्यात आला होता. तसेच हा व्हिडीओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टॅग करण्यात आला होता.

दरम्यान, यानंतर या संपूर्ण घटनेची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेत कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ एमएसआरटीसी अधिकाऱ्यांना दिले होते. यानंतर ही कारवाई करण्यात आली. मुंबई-पुणे मार्गावर ई-शिवनेरी बसमध्ये २२ मार्च रोजी ही घटना घडल्याची माहिती सांगितली जाते. यासंदर्भात बोलताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं की, “ई-शिवनेरी ही मुंबई-पुणे मार्गावरील एक महत्त्वाची सेवा आहे. या बसमधून अनेक लोक प्रवास करतात. ही सेवा अपघातमुक्त म्हणून ओळखली जाते. मात्र, अशा प्रकारे बस चालवल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करणं आवश्यक आहे. तसेच आता अशा देखील तक्रारी आल्या आहेत की ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचे चालक गाडी चालवताना मोबाईलवर क्रिकेट किंवा चित्रपट पाहतात. यावर देखील कारवाई केली जाईल”, असं ते म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply