Shiv Sena Symbol Row : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; आता संसदेतील शिवसेनेचं कार्यालयही शिंदे गटाला दिलं

 

shivsena political crisis : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिवसेना नाव, धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याच्या निर्णयानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर विधान भवनातील शिवसेना कार्यालय ताब्यात घेतलं. त्यानंतर आता संसदेतील शिवसेना कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात देण्यात आले आहे. संसदेतील सेना कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात गेल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी आयोजित केली आहे. या कार्यकारिणीत आमदार, खासदार आणि शिवसेनेचे अन्य नेते उपस्थित राहतील. दरम्यान, शिंदे गटाने सोमवारी विधानभवनातील सेना कार्यालयावर ताबा मिळवला. त्यानंतर आज शिंदे गटाच्या विनंतीनंतर संसदेने शिवसेना कार्यालयाचा ताबा शिंदे गटाकडे दिला आहे.

संसदेतील शिवसेना कार्यालय ताबा शिंदे गटाला दिल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. संसदेतील कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर शिंदे गट सेना भवन ताब्यात घेणार का, अशी राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, शिंदे गट शिवसेना भवनावर दावा करण्याचा चर्चेवर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.' शिवसेना भवनावर आम्ही ताबा घेणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

'आम्ही कोणाच्याही कोणत्याही मालमत्तेवर दावा करणार नाही आम्हाला त्याची गरज नाही, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे नेत आहोत. त्याच्या कोणत्याही मालमत्तेवर आमचा दावा नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  हे सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे

भाजपच्या माजी मंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलं. आयोगाच्या या निर्णयानंतर शिंदे गटात आनंदाचं वातावरण असून ठाकरे गटातून संताप व्यक्त केला जात आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय हा एकतर्फी असून आयोग बरखास्त करा अशी मागणी, उद्धव ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान, त्यांच्या या मागणीला भाजपच्या माजी मंत्र्याने समर्थन दिलं आहे.

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना हटवण्याच्या उद्धव ठाकरेंच्या मागणीला मी पाठिंबा देत आहे. कारण त्यांचा याआधीचा वित्त मंत्रालयातील कार्यकाळ संशयास्पद होता, असं ट्विट भाजपचे माजी मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply