Sanjay Raut : खासदार संजय राऊत धमकी प्रकरणी पुण्यातून एकजण ताब्यात

पुणे : खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या नावाने धमकीचा मेसेज पाठविल्याप्रकरणी एकास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी पुणे पोलिसांनी त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

राहुल तळेकर (वय २३ रा. वडगाव शेरी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तळेकर हा नगर रस्त्यावरील वडगाव शेरी भागात राहायला आहे. तो एका हॉटेलमध्ये काम करतो, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली. पंजाब, हरियानामध्ये दहशत असलेल्या लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याचा संदेश पाठविण्यात आला होता. त्यामुळे राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांना तांत्रिक तपासातून काही माहिती हाती आली होती. त्यानुसार एक संशयित पुण्यातील असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. याबाबतची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.

त्यानुसार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता. ३१) रात्री चंदननगर भागातील एका हॉटेलमधून तळेकरला ताब्यात घेतले. तळेकर एका हॉटेलमध्ये काम करत असून त्याने राऊत यांना धमकीचा संदेश का पाठविला? त्याचा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंध काही आहे का?, याचा तपास करण्यात येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply