Sanjay Raut : २०२४ मध्ये ED कार्यालयात कोणाला पाठवायचं याच्या याद्या तयार करू; संजय राऊतांच्या विधानानं खळबळ

Sanjay Raut on Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना खळबळजनक विधान केले आहे. २०२४ साली ईडीच्या कार्यालयात कोणाला पाठवायचं आणि किती वेळ बसवायचे, याची यादी आम्ही लवकरच तयार करु, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, जयंत पाटील  हे स्वाभिमानी नेते आहेत. ते या दबावापुढे झुकणार नाहीत. ते तपास यंत्रणांना सामोरे जाणार आहे. सूडाच्या भावनेतून सगळयांची चौकशी सुरु आहे. आम्ही देखील या सगळ्यातून गेलो आहोत, यापुढेही जावे लागू शकते. हे एक राजकीय दबावाचे षडयंत्र आहे. काही गोष्टी आम्ही करत नाही, तेव्हा आम्हाला गुडघे टेकण्यासाठी भाग पाडण्याचे प्रयत्न होतात. पण आम्ही गुडघे टेकलेले नाहीत. आम्ही संकटाला सामोरे गेलो आणि पुढेही जाणार असे संजय राऊत यांनी म्हटले.

ED चौकशीवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

ईडी कार्यालयात चौकशीला जाण्यापूर्वी जयंत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. 'याप्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. ईडीच्या चौकशीला मी घाबरत नाही अशी रोखठोक प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.

जयंत पाटील यांनी सांगितले की, 'मला ईडीकडून जी नोटीस पाठवण्यात आली आहे त्यावर काहीच विषय लिहिलेला नाही. त्यावर फक्त आयएल आणि एफएसचा उल्लेख आहे. पण या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. याबाबत मला काहीच माहिती नाही. त्यांना काय जाणून घ्यायाचे आहे हे मला माहिती नाही. पण मी ईडीला चौकशीत सहकार्य करणार आहे. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी देईन.'

दरम्यान, जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राज्यभरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. तर ईडी कार्यालय असलेल्या बॅलर्ड पिअर भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply