Sanjay Raut Bail Granted: ‘जामिनाला स्थगिती द्या, मोठी नावं गुतली आहेत’, ईडीची कोर्टात मागणी, राऊत म्हणाले “आम्ही काही देश सोडून जाणार नाही ”

Money Laundering Case Sanjay Raut Bail Granted: कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेले संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. खासदार संजय राऊत यांना विशेष न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर झाला आहे. संजय राऊत यांच्यासह त्यांचे सहकारी प्रवीण राऊत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान ईडीने संजय राऊत यांच्या जामिनाला विरोध केला आहे. मात्र ईडीने या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी तीन वाजता निर्णय दिला जाणार आहे.

ईडीने संजय राऊत यांच्या जामिनाला विरोध करताना आपल्याला दाद मागण्यासाठी वेळ द्यावा अशी मागणी केली. ‘प्रत्येक तपास यंत्रणेला उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे. आम्हाला ठराविक वेळ द्यावा असे नाही, पण आम्हाला उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी आदेशाला स्थगिती द्यावी,’ अशी मागणी ईडीने केली.

हे लहान प्रकरण नाही. अनेक मोठी नावे यात गुंतलेली आहेत. त्यामुळे निकालाला स्थगिती द्यावी आणि निकालाला आव्हान देण्याची संधी द्यावी अशी मागणी ईडीने केली आहे.

ईडीच्या मागणीला प्रवीण राऊत यांच्यावतीने विरोध करण्यात आला. जामीन मिळाला असला तरी आम्ही कुठेही पळून जाणार नाही असा युक्तिवाद त्यांनी केला. तपास यंत्रणेला त्यांचा कायदेशीर मार्ग निवडण्याचा अधिकार आहे. उच्च न्यायालय आजपासून नियमित सुरू झालं आहे. त्यामुळे तिथे ईडीने तिथे दाद मागावी असं प्रवीण राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊतांसह त्यांचे नातेवाईक आणि या प्रकरणातील आरोपी प्रवीण राऊत यांच्या जामीन अर्जावरही विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी निर्णय राखून ठेवला होता. संजय आणि प्रवीण राऊत या दोघांच्या जामीन अर्जावर न्यायालय एकाच वेळी निर्णय देणार आहे का ? अशी विचारणा ईडीच्या वतीने न्यायालयाकडे करण्यात आली होती. त्यावर आर्थिक गैरव्यवहारातील निधी प्रवीण राऊत यांनी संजय राऊत यांच्या खात्यात वळवल्याचा आरोप आहे. त्यामुळे प्रवीण राऊत यांच्या जामीन अर्जावर निर्णय दिल्याशिवाय संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर निकाल दिला जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर राऊत यांनी नियमीत जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. त्यांच्या अर्जाला ईडीने विरोध केला. राऊत हे पत्राचाळ पुनर्विकासात सक्रिय सहभागी होते. राऊत हेच पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी नातेवाईक प्रवीण राऊत यांच्या आडून हा घोटाळा केल्याचा आरोपही ईडीने राऊत यांच्या जामिनाला विरोध करताना केला होता.

पत्रा चाळीतील १०३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात संजय राऊत यांचा सुरुवातीपासूनच सहभाग असल्याचा दावा ईडीने केला आहे. या प्रकरणी ईडीने नुकतेच आरोपपत्र दाखल केले होते. पत्रा चाळ पुनर्विकासात राऊत यांचा थेट सहभाग असून, अगदी सुरुवातीपासून ते प्रत्येक गोष्ट कृतीत आणण्यात त्यांचा सहभाग असल्याचा दावा ईडीने आरोपपत्रात केला आहे.

आरोपपत्रानुसार, २००६-०७ मध्ये पत्रा चाळीच्या पुनर्विकासाबाबत तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका झाल्या होत्या. त्यात संजय राऊत म्हाडा अधिकारी व इतरांसह सहभागी झाले होते. त्यानंतर राकेश वाधवान या प्रकरणात सहभागी झाले. या प्रकरणात नियंत्रण राहावे म्हणून संजय राऊत यांनी प्रवीण राऊत यांना मोहरा म्हणून मेसर्स गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक केले. सोसायटी, म्हाडा आणि मेसर्स गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात त्रिपक्षीय करार झाला होता, असेही ईडीने आरोपत्रात म्हटलं आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply