Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू

Mumbai : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर ४ जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची माहिती आहे. या हल्लात संदीप देशपांडे जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मनसे नेते संदीप देशपांडे हे आज पहाटेच्या सुमारास शिवाजी पार्क परिसरात मॉर्निग वॉकसाठी गेले होते. यावेळी अज्ञात हल्लेखोर तिथे आले आणि त्यांनी अचानक संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला चढवला.  राजकीय वैमन्यस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा संशय आहे. 

मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप देशपांडे यांच्यावर ४ जणांनी स्टंपने हल्ला चढवला. या हल्ल्यात देशपांडे यांच्या डोक्याला तसेच पायाला दुखापत झाली. दरम्यान, देशपांडे यांनी स्वतःचा बचाव केला. त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

संदीप देशपांडे हे एक कट्टर मनसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयी देखील झाले.

1995 मध्ये संदीप देशपांडे भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस झाले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत मनसेची स्थापना केली तेव्हापासून ते आजपर्यंत संदीप देशपांडे मनसेत आहेत. ते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. बऱ्याच वेळी ते आपल्या ट्विटच्या माध्यमातून मनसेची भूमिका मांडत असतात.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply