RCB च्या ड्युप्लेसिसने CSK मधील जुन्या मित्रांची घेतली गळाभेट

नवी मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामातील (IPL 2022) 22 वा सामना हा चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात होत आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिसकडे (Faf Du Plessis) सर्वांचे लक्ष असणार आहे. कारण जवळपास एक दशक फाफ ड्युप्लेसिस हा चेन्नई सुपर किंग्जचा एक महत्वाचा खेळाडू राहिला आहे. मात्र आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात त्याला आरसीबीने आपल्या गोटात ओढले. आरसीबीने त्याच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ देखील घातली.

दरम्यान, आज डी. वाय. पाटील मैदानावर आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. हंगामातील हा पहिलाच सामना असल्याने दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. या सामन्याला विशेष महत्व आहे. कारण पूर्वाश्रमीचा सीएसकेचा स्टार प्लेअर फाफ ड्युप्लेसिस हा आता चेन्नईच्या विरूद्ध दंड थोपटणार आहे. दरम्यान, सामन्यापूर्वी सराव सत्राच्यावेळी आरसीबीचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिस आपल्या जुण्या संघ (Old Friends From CSK) सहकाऱ्यांना भेटला. यावेळी त्याने त्यांना कडकडून मिठी मारली. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावेळी विराट कोहलीने देखील सीएसकेचा नवा कर्णधार रविंद्र जडेजाशी हस्तांदोलन केले. बहुदा विराट जडेजाचे कर्णधारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करत असावा. फाफ ड्युप्लेसिस सीएसकेच्या आपल्या जुन्या सहकाऱ्यांना भेटून आनंदी झाला.

फाफ ड्युप्लेसिस हा 2011 ते 2021 पर्यंत सीएसकेचा एक महत्वाचा भाग राहिला आहे. मात्र 2022 च्या लिलावापूर्वी सीएसकेने त्याला रिटेन केले नव्हते. लिलावात ड्युप्लेसिसला आरसीबीने 7 कोटी रूपयांना घेतले. सीएसकेने देखील फाफला संघात परत आणण्यासाठी बोली लावली होती. मात्र आरसीबीने बाजी मारली. यंदाच्या आयपीएल हंगामात आरसीबीने ड्युप्लेसिसच्या नेतृत्वात 4 पैकी 3 सामने जिंकून चांगली सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जने आपले चारही सामने गमावले आहेत. त्यांना स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी विजयाची आवश्यकता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply