मुंबई : राणा दाम्पत्याच्या अडचणी पुन्हा वाढणार?; मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस

मुंबई: अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार रवी राणा यांना पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये राणा दाम्पत्याला येत्या 8 जूनला त्यांना मुंबईत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर मुंबई पोलीस राणा दाम्पत्याविरोधात दोषारोपपत्र देखील दाखल करणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा हट्ट राणा दाम्पत्याने धरला होता. 

त्यावेळी राणा दाम्पत्य निर्णयावर ठाम असल्याने पोलीस राणा दाम्पत्याला कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांच्या खारच्या घरी गेले होते, तेव्हा राणा यांनी पोलिसांना सहकार्य केले नाही, उलट पोलिसांवर अरेरावी केल्याचा आरोप राणा यांच्यावर आहे, 'आम्ही खासदार आहोत, तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही', असं म्हणत त्यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातल्याच्या व्हिडिओ क्लिपही व्हायरल झाल्या होत्या.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आयपीसीच्या कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यासंबधित मुंबई पोलिसांनी ही नोटीस बजावली असल्याची माहिती आहे. आता राणा दाम्पत्याला येत्या 8 जून रोजी मुंबई मुंबईतल्या वांद्रे कोर्टात हजर राहावं लागणार आहे.

दुसरीकडे राणा दाम्पत्याला मुंबईत हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर आता ते राज्यसभेसाठी मतदान करणार की नाही ही चर्चा जोर धरू लागली आहे. येत्या 10 जूनला राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक बिनविरोध होणार नसल्यामुळे राज्यसभेसाठी सत्ताधारी तसेच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यसभेच्या 6 पैकी 5 जागांवर संबधित पक्षाचे उमेदवार सहजपणे निवडूण येतील. मात्र सहाव्या जागेसाठी चांगलीच चूरस होणार आहे.

विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे शिवसेना 55, राष्ट्रवादी 53 आणि काँग्रेस 44 अशी महाविकास आघाडीतील तीन घटक पक्षांची 152 मते आहेत. भाजपचे 106 आमदार आहेत. अपक्ष आणि छोट्या पक्षांचे 29 आमदार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply