Rajgad Fort : पुणे परिसर दर्शन : गडांचा राजा राजगड

Rajgad Fort : छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६४६ मध्ये तोरणा किल्ला जिंकल्यावर समोरच असलेला मुरुंबदेवाचा डोंगर हा चौकीवजा किल्ला घेतला. तोरणावर सापडलेल्या धनाचा वापर करून महाराजांनी त्याची पुनर्बांधणी केली. तीन माच्या आणि बालेकिल्ल्याचे बांधकाम एवढे अभेद्य होते की पुढे चाळीस वर्षे हा किल्ला अजिंक्य राहिला. महाराजांनी या मुरुंबदेवाचे नामकरण ‘राजगड’ असे करून तिथे आपली राजधानी स्थापन केली. राजधानी असल्यामुळे महाराजांचा, जिजाऊंचा आणि इतर राजघराण्यांच्या लोकांचा वावर या गडावर मोठ्या प्रमाणात होता. इथूनच महाराज अफजलखान मोहिमेला प्रतापगडावर निघाले. इथेच ५ सप्टेंबर १६५९ रोजी महाराणी सईबाईंचे निधन झाले.

अफजलखानाचा वध करून झाल्यावर त्याचे शीर इथल्याच बालेकिल्ल्याच्या दरवाजात चिणले होते, असे म्हटले जाते. पन्हाळ्यावरून निसटून महाराज विशाळगडमार्गे राजगडलाच आले. इथेच इ. स. १६७० ला राजाराम महाराजांचा जन्म झाला. सुरतेची लूट अखेर राजगडावरच आणून ठेवली होती. महाराजांनी इ. स. १६७१ मध्ये दहा हजार होन खर्चून राजगडाची दुरुस्ती केली. पुढे १६८९ मध्ये हा गड औरंगजेबाने जिंकून घेतला, त्या लढाईमध्ये संताजी शिळीमकर हा शूरवीर कामी आला. पण, अवघ्या तीनच वर्षांत राजगड हनुमंतराव फाटक यांनी परत स्वराज्यात आणला. पाली, वाजेघर, गुंजवणे आणि भूतोंडे या गावातून मुख्य वाटा आहेत, तसेच भुतोंडे खिंडमार्गे तोरणाकडून या गडावर येता येते.

कसे जाल?

पुण्याहून एसटीने वाजेघर, पाली, भुतोंडे आणि गुंजवणे या सर्व ठिकाणी जाता येते. तेथून गडावर जायला साधारण दोन ते अडीच तास लागतात..

काय पहाल?

पद्मावती माची - पाली दरवाजा म्हणजे महादरवाजा, पद्मावती तळे, पद्मावती मंदिर, सदर, पाण्याची टाकी, चोर दरवाजा, गुंजवणी दरवाजा, अंबारखाना, दारू कोठार.

सुवेळा माची - तटबंदी, झुंजार बुरूज, डुबा हे टेकाड, पाण्याची टाकी, सदर, मुहूर्ताची गणेशाची मूर्ती, हत्ती प्रस्तर, नेढ.

संजीवनी माची - दुहेरी तटबंदी, बुरूज, पाण्याची टाकी, सदर, वाड्याचे अवशेष, अळू दरवाजा, चोर दिंडी.

बालेकिल्ला - प्रवेशद्वार, देवीचे मंदिर, ब्रह्मर्षि मंदिर, राजवाडा, सदर, घरांची जोती, छोटी बाजारपेठ, चंद्रतळे आणि वरून दिसणाऱ्या तीनही माच्या.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply