पुणे:सवलतीमध्ये मिळकतकर भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ; मिळकतकरातून दोन महिन्यात ९४० कोटींचे उत्पन्न

चालू आर्थिक वर्षातील मिळकतर सवलतीमध्ये भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय महापालिकेच्या कर आकारणी आणि करसंकलन विभागाने घेतला आहे. सर्वसाधारण करामध्ये पाच ते दहा टक्क्यांपर्यंतची सवलत मिळविण्याची मुदत तीन जूनपर्यंत करण्यात आली आहे.

दरम्यान, शहरातील ५ लाख ९३ हजार २७० मिळकतधारकांनी दोन महिन्यांच्या कालावधीत ९३९ कोटी ८९ लाख रुपयांचा मिळकतकर जमा केला आहे. मिळकतकर भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये ६४ हजार ९३३ मिळकतधारकांनी १३२ कोटी ६७ लाख रुपयांचा मिळकतकर भरणा केला असून गतवर्षी पेक्षा मिळकतरकाचे उत्पन्न १९३ कोटी ८८ लाख रुपयांनी जास्त जमा झाले आहे. गेल्या वर्षी ३१ मार्च पर्यंत मिळकतकरातून ७४६ कोटी १ लाखाचे उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते.

ज्या मिळकतधारकांची सर्वसाधारण कराची रक्कम २५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशा मिळकतधारकांना सर्वसाधारण करामध्ये दहा टक्के सवलत दिली जाते. तर, ज्या मिळकधारकांची सर्वसाधारण कराची मागणी २५ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा मिळकतधारकांना सर्वसाधारण करामध्ये पाच टक्के सवलत दिली जाते. त्यासाठी मिळकतकराची सर्व रक्कम ३१ मे पर्यंत भरणे अपेक्षित असते. अद्यापही काही मिळकतधारकांनी कर भरणा केलेला नाहीत. त्यातच ऑनलाइन भरताना महापालिकेचे संकेतस्थळ क्रश झाल्याच्या तक्रारी महापालिकेच्या कर आकारणी आणि करसंकलन विभागाकडे हजारो नागरिकांनी केल्या होत्या. त्यामुळे त्यांना मुदतीमध्ये कर भरणा करता आला नव्हता. ही बाब लक्षात घेऊन सवलतीच्या दरात मिळकतर भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

मिळकतकर ऑनलाइन पद्धतीने भरण्याकडे मिळकतकरधारकांचे प्राधान्य आहे. शहरातील ४ लाख १६ हजार ९७५ मिळकतधारकांनी ५८७ कोटी ४४ लाख रुपयांचा कर भरला आहे. डिजिटल पेमंटद्वारे कर भरण्याचे हे प्रमाण ७०.२८ टक्के एवढे आहे. १ लाख १ हजार ३७७ मिळकतकरधारकांनी ८३ कोटी २० लाख रुपये रोख स्वरूपात जमा केले असून त्याची टक्केवारी १७.०८ टक्के एवढी आहे. तर ७४ हजार ९१८ मिळकतधारकांनी २६९ कोटी २४ लाख रुपये धनादेशाद्वारे भरले आहेत. त्याची टक्केवारी १२.६२ एवढी आहे, अशी माहिती कर आकारणी आणि करसंकलन विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी दिली.

१९ कोटींची सवलत

मुदतीमध्ये मिळकतकर भरलेल्या ५ लाख ९३ हजार २७० मिळकतधारकांना पाच ते दहा टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार ही रक्कम १९ कोटी २१ लाख रुपये एवढी आहे. शहरातील ८ लाख १२ हजार २२० मिळकतधारकांना मिळकतकराची देयके चालू वर्षात पाठविण्यात आली आहेत. मिळकतधारकांनी मिळकतकर भरून सवलत घ्यावी, असे आवाहन कर आकारणी आणि करसंकलन विभागाकडून करण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply