Pune : पुण्यातील वाहनधारकांसाठी आता नवीन नोंदणी क्रमांकांचे पर्याय उपलब्ध; इंग्रजीतील तीन अक्षरांची सिरीज सुरू करणारे देशातील दुसरे शहर म्हणून पुण्याचा मान.

Pune : पुणे आरटीओअंतर्गत सध्या झेड अक्षराने सुरू होणाऱ्या मालिका अंतिम टप्प्यात आहेत. दोन अक्षरी मर्यादेमुळे उपलब्ध क्रमांकांची संख्या मर्यादित असते. ही मर्यादा संपत आल्याने आणि भविष्यातील ३०-४० वर्षांची सोय म्हणून तीन अक्षरी मालिका फायद्याची ठरणार आहे. तीन अक्षरी मालिकेमुळे नवीन क्रमांकांचे पर्याय उपलब्ध होतील; तसेच यामध्ये शब्द तयार होण्याची संधी असल्याने ‘चॉइस नंबर’ घेणाऱ्यांकडून आरटीओला मोठा महसूल मिळेल. यामुळे वाहन नोंदणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होण्यास मदत होईल.

शहराची वाहनसंख्या वेगाने वाढत असल्याने वाहनांना देण्यात येणाऱ्या दुहेरी इंग्रजी अंकाची मालिका (सीरीज) संपत आली आहे. वाहनांची नोंदणी थांबू नये, यासाठी पुण्यातील वाहन क्रमांकासाठी आता इंग्रजी तीन अक्षरांची मालिका सुरू करण्याचा निर्णय पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) घेतला आहे. नवी दिल्लीनंतर इंग्रजी तीन अक्षरांची सिरीज सुरू होणारे पुणे देशातील दुसरेच शहर ठरणार आहे.

पुण्यात सार्वजनिक वाहतूकव्यवस्था सक्षम नसल्यामुळे खासगी वाहने वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातही दुचाकी वापरणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. पुणे आरटीओकडे आतापर्यंत नोंदणी असलेल्या वाहनांची संख्या ४३ लाखांवर पोहोचली आहे. त्यामध्ये दुचाकींचा संख्या ३० लाखांच्या जवळ आहे. आयटी हब, शैक्षणिक केंद्र आणि ऑटोमोबाइल क्षेत्रातील विस्तारामुळे पुण्यात महिन्याला हजारो नवीन वाहनांची नोंदणी होते.

पुण्यात मुहूर्तावर वाहन खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण खूप असते. त्यामुळे त्या काळात आणखी वेगाने वाहनांची मालिका संपते. त्यामुळे पुढील काही महिन्यात ही मालिका ‘झेडझेड’पर्यंत पोहोचेल, तेव्हा दोन अक्षरी मालिकेचा साठा पूर्णपणे संपलेला असेल. अशा वेळी आरटीओ प्रशासनाने ‘एएए’पासून सुरू होणारी तीन अक्षरी मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे आता पुण्याच्या रस्त्यावर ‘एमएच १२ एएए ००१’ यांसारख्या क्रमांकाच्या गाड्या धावताना दिसतील. यापूर्वी दिल्लीत तीन अक्षरी मालिका वापरली जाते. आता तीन अक्षरांची आरटीओ सीरीज वापरणारे पुणे दुसरे शहर ठरणार आहे.



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *