Pune Road : रस्ते जोडा अन् कोंडी फोडा! शहरातील ३८ मार्ग प्राधान्याने करणार विकसित

पुणे - शहरातील अर्धवट राहिलेले रस्ते वाहतुकीला खुले करण्यासाठी महापालिकेने अभ्यास केला. त्यात तब्बल ४०१.२२ किलोमीटरचे अविकसित रस्ते (मिसिंग लिंक) आढळून आले आहेत. त्यातील अत्यावश्‍यक आणि कमी अंतर असणारे ३८ रस्ते निश्चित झाले आहेत. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत ११ उपनगरांमधील या रस्त्यांच्या जागा ताब्यात घेऊन, ६.५ किलोमीटरचे रस्ते एकमेकांना जोडून कोंडी फोडली जाणार आहे.

पुणे महापालिकेत आतापर्यंत १९९७, २०१७, २०२१ अशा तीन टप्प्यांत हद्दीलगतची ५८ गावे समाविष्ट झाली. त्यामुळे शहराचे क्षेत्रफळ ५१८ चौरस किलोमीटर इतके झाले आहे. ही गावे महापालिकेत आली असली, तरी तेथील रस्त्यांच्या प्रश्‍न गंभीर आहे. पर्यायी मार्ग नसल्याने लहान रस्ते अपुरे पडत आहेत. त्यामुळे महापालिकेने गेल्यावर्षीपासून अविकसित रस्ते शोधण्याचे काम हाती घेतले होते. त्यामध्ये ४०१.२२ किलोमीटरचे अविकसित रस्ते समोर आले आहेत.

१२८ किलोमीटरचे रस्ते हे ‘पीएमआरडीए’च्या रिंगरोडमध्ये समाविष्ट असल्याने हा भाग महापालिकेने वगळला आहे. उर्वरित २७३.२२ किलोमीटर लांबीचे ३९० रस्ते महापालिकेने शोधले आहेत. हे रस्ते एकाच वेळी विकसित करणे अशक्य आहे, त्यासाठी मोठ्याप्रमाणात निधी लागणार आहे.

Pune Fire News : पुण्यात येवलेवाडी येथे गोडाऊनला भीषण आग! अग्निशामक दलाच्या १० गाड्या घटनास्थळी

महापालिकेने केलेल्या अभ्यासात धायरी, हडपसर, वारजे, कोथरूड, बाणेर, पाषाण, औंध या शहराच्या प्रवेशद्वारावरील भागातच सर्वाधिक रस्ते अविकसित असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये धायरीतील ४० किलोमीटरचे, तर हडपसरमध्ये ४५ किलोमीटरचे रस्ते अद्याप कागदावर आहेत.

स्वतंत्र अभियंते नेमणार

पहिल्या टप्प्यात कमी अंतराचे, पण महत्त्वाचे असलेले रस्ते विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यातील ३८ रस्त्यांची निवड केली असून, २० मीटर ते ३०० मीटर लांबीचे रस्ते अर्धवट आहेत. त्यांना प्राधान्य देऊन जागा ताब्यात घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

प्रत्येक रस्त्यासाठी स्वतंत्र अभियंता, रस्ता ताब्यात न येण्याची कारणे निश्‍चित करून हे प्रश्‍न एक महिना ते सहा महिन्यांत मार्गी लावून रस्ते ताब्यात घेतले जाणार आहेत. या कामाची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे दिली आहे.

 

कामे रखडण्याची कारणे (कंसात रस्ते)

  • ८ - रोख मोबदल्याचा आग्रह

  • १२ - टीडीआर, एफएसआय देणे प्रलंबित

  • ६ - अनधिकृत बांधकाम

  • २ - शासकीय जमीन ताब्यात न येणे

  • ५ - न्यायालयीन प्रकरणे

  • ५ - जागा ताब्यात येण्याची लांबलेली प्रक्रिया

अविकसित रस्ते (किलोमीटरमध्ये)

४८.१८ - पुणे शहराची जुनी हद्द

९३.२१ - १९९७ ला समाविष्ट झालेली २३ गावे

१८०.० - २०११ ला समाविष्ट झालेली ११ गावे (आरपी)

८०.०५ - २०२१ ला समाविष्ट झालेली २३ गावे

या भागातील आहेत ३८ रस्ते

हडपसर, कोंढवा, कात्रज, आंबेगाव नऱ्हे, वडगाव, कर्वेनगर, कोथरूड, सुतारवाडी, लोहगाव, खराडी, येरवडा

महापालिकेने शहरातील रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी ‘मिसिंग लिंक’चा अभ्यास केला आहे. त्यातील ३८ रस्त्यांची कामे पहिल्या टप्प्यात हाती घेतली आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यांत या जागा ताब्यात येतील. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार आहे.

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply