Pune Rain Updates : पुण्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात; नागरिकांना उकाड्यापासून दिलासा

Pune Rain News : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहरासह परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. अचानक आलेल्या या पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पुण्यात मंगळवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. मात्र, दुपारनंतर दाट ढग दाटून आले आणि पावसाने हजेरी लावली.

हवामान खात्याने पुण्यात सकाळी आकाश निरभ्र आणि दुपारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. हवामान विभागाचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे पुणेकर हैराण झाले होते. त्यांना सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

पुण्यात दुपारनंतर आकाशात क्युम्यूलोनिंम्बस म्हणजेच उंचीने मोठे ढग तयार झाले होते. त्यामुळे आज दुपारच्या सुमारास शहरात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. या प्रकारच्या ढगांमुळे कमी वेळेत अधिक पाऊस पडतो. तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची देखील दाट शक्यता असते. 

राज्यात येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज

हवामान खात्याने येत्या २४ तासांत राज्यातील काही भागात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीटीचा अंदाज वर्तवला आहे. खरंतर, महाराष्ट्रासह इतरही राज्यांमध्ये सध्या मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, कोकण किनारपट्टीच्या भागात हवेतील आर्द्रतेचं प्रमाण अद्याप कमी न झाल्यामुळे नागरिकांना उन्हाचा आणखी तडाखा सहन करावा लागणार आहे. तर पुढच्या २४ तासामध्ये मराठवाडा, विदर्भासह राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्याने आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply