पुणे : पीएमआरडीएकडून ३०० कोटींच्या निधीची राज्य शासनाकडे मागणी

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) करत असलेल्या विकास प्रकल्पांसाठी निधीची आवश्यकता आहे. पीएमआरडीएच्या विकास आराखड्यातील प्रकल्प ज्यामध्ये रस्ते, पंतप्रधान आवास योजना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल आदी कामासाठी ३०० कोटी रूपये निधीची मागणी पीएमआरडीएने राज्य शासनाकडे केली आहे.

केंद्र सरकारकडून भांडवली विकास कामांसाठी उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या बिनव्याजी विशेष साहाय्य योजनेतून तो उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाबाबत महापालिका, पीएमआरडीए आणि राज्य सरकार यांच्यामध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत उड्डाणपुलासाठी येणाऱ्या एकूण खर्चाच्या ५० टक्के खर्च महापालिकेने उचलावा असे ठरले होते. मात्र, महापालिकेने त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. याशिवाय पंतप्रधान आवाज योजनेतंर्गत घरे, प्रारूप विकास आराखड्यातील रस्ते अशा विविध प्रकल्पांचे नियोजन पीएमआरडीएने हाती घेतले आहेत. अशा सर्व प्रकल्पांसाठी पीएमआरडीएला निधीची आवश्यकता आहे.

विद्यापीठ चौकात उड्डाणपूल असून देखील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. मेट्रोचे नियोजन झाल्यानंतर टाळेबंदी काळात येथील पूल पाडण्यात आला. परंतु त्यानंतर अनेक दिवस पूल उभारणीच्या कामात काहीच हालचाली होत नसल्याने नागरिकांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. त्यानंतर बैठका, आराखडे मंजुरीच्या प्रक्रिया सुरू झाल्या. आता चौकात उभारण्यात येणाऱ्या पुलासाठी वाढीव निधी मंजुर करत कामाला देखील सुरूवात झाली आहे. आगामी ५० वर्षांचा विचार करून हा दूमजली पुल उभारण्यात येणार आहेत. पाषाण, औंध, बाणेरकडून विद्यापीठ चौकात येणारी वाहनांची वाहतूक सुरळीत होऊन, वाहतूक कोंडीपासून सुटका होईल अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील दुमजली उड्डाणपूल, पंतप्रधान आवास योजना, विकास आराखड्यातील रस्ते अशा विविध प्रकल्पांसाठी या वर्षी पहिल्या टप्प्यात तीनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, असे पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

उर्वरित जागांचे लवकरच हस्तांतरण

पीएमआरडीएकडून करण्यात येणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी अद्यापही काही आवश्यक जागा पीएमआरडीएकडे पूर्णपणे हस्तांतरित झालेल्या नाहीत. याबाबत पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेतली. काम सुरू करण्यासाठी आवश्यक जागा हस्तांतरित करण्यात आल्या असून तुकड्या-तुकड्यातील काही जागांचा प्रश्न अद्याप बाकी आहे. हा प्रश्नही तातडीने निकाली काढण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply