Pune PMP Bus : तरुणीसाठी ‘पीएमपी’ थेट रुग्णालयात! महिला वाहकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण

पुणे - वेळ दुपारची...पीएमपी बस येवलेवाडीहून स्वारगेटला निघालेली...प्रवाशांच्या गर्तेत एका तरुणीला अस्वस्थ वाटत होत...स्वारगेट आल्यावर सर्व प्रवासी उतरले...मात्र ती तरुणी मान खाली करून बसलेली...वाहकाने तिला उठविले, तशी ती विव्हळली! म्हणाली, ‘मला त्रास होतोय माझ्या वडिलांना कळवा’... तिचा हा त्रास वाहकाला शांत बसू देत नव्हता...त्या बसच्या खाली उतरल्या...मदतीसाठी दोन सहकाऱ्यांना सोबत घेतले...बस थेट रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला अन् त्या तरुणीचे प्राण वाचले.

शिरीन मुजावर या गेल्या पाच वर्षांपासून ‘पीएमपी’त वाहक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती स्वारगेट डेपोत आहे. मागच्या आठवड्यात त्या ‘येवलेवाडी ते स्वारगेट’ या मार्गावरील बसमध्ये कर्तव्यावर होत्या, त्यावेळी ही घटना घडली. त्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे त्या तरुणीचे प्राण वाचले. शिवाय ‘पीएमपी’चा प्रवाशांविषयी असलेला दृष्टिकोनही अधोरेखित झाला. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. शिरीन याही उपवास करीत आहेत. त्या दिवशी बस प्रवाशांनी खचाखच भरली होती. काम संपवून घरी जाण्याची ओढ होती, मात्र समोरच अस्मिता राज चौधरी (रा. भोसरी) या तरुणीला चक्कर आली. तिला मांडीवर झोपविले. लिंबू पाणी देण्याचा विचार आला, पण तेवढा वेळ नव्हता. स्वारगेट डेपोतून दोन सहकाऱ्यांना सोबत घेतले अन् बसने थेट मुकुंदनगरातील एक खासगी रुग्णालय गाठले.

या दरम्यान, तरुणीच्या वडिलांना घटनेची माहिती दिली. त्यांना येण्यास उशीर होणार होता. त्यामुळे शिरीन तेथेच ठाण मांडून बसल्या. अस्मिताला तत्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार सुरू झाले. थोड्या वेळानंतर तिला जाग आली. आपुलकीचे शब्द बोलून आस्थेवाईकपणे चौकशी झाली. तेवढ्यात मुलीचे वडील आले. शिरीन यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे स्वारगेट डेपोत त्यांचे कौतुक झाले. त्या तरुणीच्या वडिलांनीही आभार मानले.

रमजानच्या पवित्र महिन्यात आपल्या हातून चांगले कार्य घडल्याचे शिरीन यांनी सांगितले. या कार्याची दखल घेऊन ‘पीएमपी’ प्रशासनाने अध्यक्षांच्याहस्ते शिरीन यांचा सन्मान केला जाणार आहे.

पीएमपी प्रशासन नेहमीच चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे कौतुक करते. लवकरच शिरीन यांचादेखील सन्मान केला जाईल.

- ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply