Pune : नगर रस्त्यावर चार विभागांची संयुक्त अतिक्रमण कारवाई

वडगाव शेरी : नगर रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यासाठी पुणे महानगरपालिका, पीएमआरडीए आणि पीडब्ल्यूडी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अशी संयुक्तपणे मोठी अतिक्रमण कारवाई सुरू आहे. खराडी बाह्यवळण चौकापासून सुरू झालेली ही कारवाई खराडी जकात नाका, खांदवे नगर ते वाघोली पर्यंत सुरू आहे.

नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर यांच्या नियंत्रणाखाली पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत नगर रस्त्याच्या बाजूच्या अतिक्रमणांवर ही कारवाई करण्यात येत आहे. कारवाईत तब्बल आठ जेसीबी, अनेक कामगार सहभागी झाले आहेत.

विमाननगर प्रभागाचा काही भाग, खराडी, लोहगाव आणि वाघोली च्या महसुली हद्दीतून जाणारा नगर रस्त्याच्या बाजूच्या अतिक्रमणांवर ही कारवाई सुरू आहे. या कारवाईमध्ये रस्त्याच्या बाजूचे शेड, नाम फलक, पुढे आलेले दुकानांचे शेड, पुढे आलेल्या पत्र्याच्या सीमा भिंत, अनधिकृत स्टॉल, व्यवसायिकांनी रस्त्यावर मांडलेले बांधकाम साहित्य कारवाईत जेसीबीच्या साह्याने काढण्यात येत आहेत.

कारवाईमुळे नगर रस्त्यावर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वाहतुकीला काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. कारवाईत सहभागी झालेल्या पोलिसांनी वाहतूक नियंत्रण करीत वाहतूक सुरळीत केली. याविषयी खराडी दर्गा परिसरातील रहिवासी विवेक चौधरी म्हणाले, रस्ता अतिक्रमण मुक्त झाला तर वाहतूक कोंडी होणार नाही. सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडीमुळे सामान्य नागरिकांचा खूप वेळ वाया जातो. शिवाय मनस्ताप होतो तो वेगळाच. आता यापुढे अतिक्रमण होणार नाही यासाठी प्रशासनाने दक्ष रहावे.

महालक्ष्मी लॉन्स परिसरात राहणाऱ्या सुलताना शेख म्हणाल्या, वाघोली पर्यंत नगर रस्ता रुंदीकरण झाले. परंतु अतिक्रमणामुळे त्याचा उपयोग होत नाही. रस्ता मोकळा झाला तर वाहतूक कोंडी होणार नाही. रस्ता अडवून थांबणाऱ्या मालवाहतूक वाहनांवर पण कारवाई व्हावी.

याविषयी सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर म्हणाले, नगर रस्त्यापासून पंधरा मीटर अंतरात पुढे आलेले अतिक्रमणांवर आज कारवाई करण्यात आली. अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए, आणि पुणे महानगरपालिका विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या कारवाईमुळे नगर रस्ता अतिक्रमण मुक्त होण्यासाठी मदत होणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply