Pune : महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष सुरक्षा अभियान - पोलिस आयुक्त रितेश कुमार

पुणे - आयटी कंपन्यांसह रात्री घरी परतणाऱ्या नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेसाठी शहरात विशेष सुरक्षा अभियान राबविण्याचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत. गुन्हे शाखा, वाहतूक शाखेचे पोलिस आणि स्थानिक पोलिसांकडून हे अभियान शुक्रवार (ता. २३) पासून राबविण्यात येणार आहे.

शहरात रात्रीची पोलिस गस्त वाढविण्यात येणार असून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

एका रिक्षाचालकाने मंगळवारी (ता. २०) पहाटे एका संगणक अभियंता तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. वानवडी परिसरातील काळेपडळ रेल्वेफाटकाजवळ हा प्रकार घडला होता. तरुणीने प्रसंगावधान राखत नियंत्रण कक्षात कॉल केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. वानवडी पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली.

परंतु या घटनेमुळे आयटी कंपन्यांसह रात्री कामावरून परतणाऱ्या नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. दरम्यान, या घटनेची पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी गुन्हे शाखा, वाहतूक पोलिसांसह सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना महिलांच्या सुरक्षिततेबाबत खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.

 

आयटी कंपन्यांमधील महिलांच्या सुरक्षिततेबाबत ‘सकाळ’ने मुद्दा उपस्थित केला होता. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत गुन्हे शाखेसह सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना महिलांच्या सुरक्षिततेबाबत तातडीने विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ही मोहीम शुक्रवार (ता. २३) पासून सुरू करण्यात येणार आहे.

पोलिसांकडून या उपाययोजना करण्यात येणार

  • शहरात रात्रीची पोलिस गस्त वाढविणार

  • आयटी कंपन्यांमध्ये सुरक्षिततेबाबत जनजागृती उपक्रम

  • उबेर, ओला, खासगी वाहनांसह रिक्षाचालकांची तपासणी करणार

  • रिक्षाचालकांचा परवाना, परमीट तपासणार

  • गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई

    प्रवाशांना लुबाडणाऱ्यांवर बसणार चाप

    स्वारगेट, शिवाजीनगर बसस्थानक आणि रेल्वे स्थानकावर बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना लुबाडण्याचे प्रकार घडत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी बसस्थानक आणि रेल्वेस्थानकाच्या परिसरात पोलिस तैनात राहतील. तसेच, मध्यरात्री भरधाव वाहने चालविणाऱ्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले.

    महिलांसाठी हेल्पलाइन क्रमांक १०९१

    पोलिस नियंत्रण कक्ष क्रमांक- १००



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply