Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद

Pune : छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (६ मार्च) शहरातील मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात मिरवणुका निघणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, नेहरू रस्ता आणि बाजीराव रस्ता या मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.

शिवजयंती निमित्त लक्ष्मी रस्ता आणि शिवाजी रस्ता परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, तसेच लष्कर वाहतूक विभागाच्या हद्दीतील महात्मा गांधी रस्ता आणि ‘ईस्ट स्ट्रीट’ या प्रमुख मार्गांवर होण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी वाहतूक वळविण्याचा निर्णय घेतला आहे.

जिजामाता चौकातून शिवाजी रस्तामार्गे स्वारगेटकडे जाणारी वाहने स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्तामार्गे खंडोजीबाबा चौक, टिळक चौक आणि टिळक रस्ताकडे वळविण्यात येणार आहेत. वारूळा पुलाकडून फडके हौद चौक आणि जिजामाता चौकाकडे येणारी वाहने दारूवाला पुल चौकातून पुढे सोडण्यात येतील.

मिरवणुका लक्ष्मी रस्त्यावर असताना सोन्या मारुती चौकापर्यंत वाहने संत कबीर चौकाच्या मार्गे वळविण्यात येतील. तसेच, पुरम चौकातून बाजीराव रस्तामार्गे शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना टिळक रस्ता, टिळक चौक आणि पुढे गोखले रस्त्याने जातील. मिरवणुका सुरू असताना अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे किंवा बाजीराव रस्त्याने फुटक्या बुरुजकडे जाणारी वाहने केळकर रस्तामार्गे वळविण्यात येतील. तसेच गाडगीळ पुतळा परिसरातून मिरवणुका पुढे जाईपर्यंत वाहनांना सावरकर भवन पुल, बालगंधर्व परिसर किंवा टकले हवेली चौकमार्गे पर्यायी मार्गाने जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, लष्कर वाहतूक विभागाच्या हद्दीतही वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. ‘नागरिकांना शक्यतो मध्यवर्ती भागात वाहने घेऊन जाणे टाळावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, ’असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *