Pune : पुण्यात फसवणुकीचा अजब फंडा, माजी सैनिकाला ७३ लाखांचा गंडा; ६ जणांविरोधात गुन्हा

Pune : विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नागरिकांना दुप्पट नफा देण्याचे अमिष दाखवून फसवणूक केली जातेय. असाच काहीसा प्रकार एका माजी सैनिकासोबत देखील घडलाय. गुंतवणुकीवर दुप्पट नफ्याचे अमिष दाखवून पुण्यात एका माजी सैनिकाची तब्बल ७३ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे फसवणूक करणाऱ्या व्यक्ती देखील माजी सैनिकच आहे. याप्रकरणी फिर्यादी राजेश गोरख यादव यांच्या तक्रारीवरून चंदननगर पोलिसांनी एका माजी सैनिकासह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

Nagpur Company Blast : नागपुरातील खासगी कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट; एकाचा जागीच मृत्यू, ७ कामगार जखमी

गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जातोय. नरेंद्र पवार, माजी सैनिक गणेश माळवदे, प्रफुल्ल कांबळे, शुभांगी पवार, स्वप्नील ठाकरे, संदीप मुळे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यादव लष्करातून निवृत्त झाले आहेत. त्यांची एका माजी सैनिकामार्फत माळवदे याच्याशी ओळख झाली. त्यांनी फिर्यादी यांना नरेंद्र पवारच्या समृद्ध भारत ट्रेडिंग सर्व्हिसच्या गुंतवणूक योजनेची माहिती दिली.

विश्वास संपादन व्हावा म्हणून आरोपींनी एका सेमिनारचे आयोजन केले. त्यांना गुंतवणूक केलेली रक्कम २० महिन्यांत दुप्पट आणि मूळ गुंतवणुकीवर दरमहा १० टक्के रक्कम परत देण्याचे आमिष दाखवले. यावर अनेक माजी सैनिक आणि त्यांच्या नातेवाइकांनी योजनेत गुंतवणूक केली.

परंतु आरोपींनी त्यांना मुद्दल आणि व्याज परतावा दिला नाही. आरोपी त्यांचे कार्यालय बंद करून पसार झाले आहेत. पोलिसांनी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केलाय. एका माजी सैनिकाचीच ७३ लाखांची फसवणूक झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply