Pune : आता राज्यातील शिक्षकांमध्ये होणार स्पर्धा.. ई साहित्य निर्मिती स्पर्धेसाठी शिक्षण विभागाचा पुढाकार!

पुणे : राज्यातील शाळांमध्ये तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अध्यापन करण्यासाठी शिक्षकांनी तयार केलेले ई साहित्य परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई साहित्य निर्मितीची चळवळ उभी राहण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांसाठी ई साहित्य निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, सर्वोत्कृष्ट ई साहित्य निर्मितीसाठी तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरासाठी प्रत्येकी ८४ पुरस्कार दिले जाणार आहेत.

शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. करोना काळात शाळा बंद असताना शिक्षकांनी ऑनलाइन पद्धतीने अध्यापन केले होते. त्यानंतर शिक्षक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन अधिक रंजक आणि दर्जेदार करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांची चळवळ अधिक सक्रीय होऊन २ लाख ८९ हजार ५६० शिक्षक तंत्रस्नेही झाल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेमार्फत आढळून आले आहे. या शिक्षकांनी केवळ आपले वर्ग ऑनलाइन पद्धतीने न घेता विद्यार्थ्यांनाही तंत्रस्नेही केले आहे. त्यामुळे विद्यार्थीही स्वत: डिजिटल साहित्य तयार करून शिक्षण मनोरंजक करत आहेत. तसेच परदेशातील शिक्षक, विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संवाद साधून साहित्य वापरत आहेत. त्यामुळे आता ई साहित्याची निर्मिती करण्यासाठी शिक्षकांची स्पर्धा घेतली जाणार आहे. त्यात पहिली ते बारावी, अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी भाषा, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे या विषयावर शिक्षकांना ॲनिमेशन, ऑग्मेंटेड रिॲलिटी, व्हर्च्युअल रिॲलिटी प्रकारातील चित्रफित, खेळावर आधारित चित्रफित, ई चाचणीवर आधारित चित्रफित, दिव्यांगत्व प्रकारानुसार शिक्षणासाठी चित्रफित तयार करता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. चित्रफितींची निवड करण्यासाठी तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर समिती नियुक्त करण्यात आली आहे.

ई साहित्यातील चित्रफिती तयार करण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत. तयार केलेले ई साहित्य गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याचा दुवा स्पर्धेसाठीच्या प्रणालीवर द्यावा लागेल. चित्रफीत केवळ अध्ययन अध्यापन प्रणालीशी निगडित असणे आवश्यक आहे. कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त नऊ मिनिटांची चित्रफीत असणे आवश्यक आहे. स्पष्टता, गरज, परिणाम, नावीन्यता, समन्वय, उपयोगिता, चित्रफीत दर्जा अशा निकषांवर ई साहित्याचे मूल्यमापन करण्यात येईल. कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन झाल्यास, साहित्यिक चोरी केल्याचे आढळल्यास, हिंसा, लैंगिक प्रदर्शन, असभ्य भाषा, अंमली पदार्थाचा वापर केल्यास, वांशिक, धार्मिक, सांस्कृतिक, लिंग पूर्वग्रहाचे समर्थन केल्यास, तांत्रिक त्रुटी असल्यास चित्रफीत स्पर्धेतून नाकारली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
स्पर्धेतील तालुका, जिल्हा, राज्य स्तरावरील पारितोषिके आणि अन्य खर्चांसाठी ११ कोटी २३ लाख ३२ हजार रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच स्पर्धेची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडे सोपवण्यात आली आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply