Pune News : सेल्फीमुळे घात झाला! बुडणाऱ्या दोन बहिणींना वाचवण्याच्या नादात भावाचा जीव गेला

Pune News : पानशेत धरणाच्या सांडव्यातील पाण्यात उतरुन सेल्फी काढताना बुडणाऱ्या दोन बहिणींना वाचविताना भावाचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (ता.२१) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

ज्ञानेश्वर बालाजी मनाळे (वय १८ रा. खराडी, पुणे) असे मयत युवकाचे नाव आहे. स्थानिक युवकांमुळे बहिणींचे प्राण वाचले असल्याची माहिती वेल्हे पोलिसानी दिली. अनुसया बालाजी मनाळे व मयुरी बालाजी मनाळे अशी त्याच्या बहिणींची नावे आहेत.

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक, मनोज जरांगे यांनी आंदोलन थांबवावं; CM एकनाथ शिंदेंचे आवाहन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर मनाळे हा आपल्या बहिणी व मित्र-मैत्रिणींसह रविवार सुट्टी असल्याने पानशेत परिसरात फिरण्यासाठी आला होता. फिरणे झाल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास सर्वजण आपापल्या दुचाकींवरुन पानशेतहून माघारी घरी चालले होते.

पानशेत धरणाच्या वीज निर्मिती सांडव्यावरील पुलावरून जाताना पुलाजवळील धो-धो वाहत असलेल्या सांडव्यावर सर्वजण गेले. पाण्याच्या कडेला उभे राहून ते सेल्फी काढत होते. त्यावेळी अनुसया मनाळे ही पाय घसरून पाण्यात पडली. तिला बाहेर काढण्यासाठी तिची बहीण मयुरी ही पाण्यात उतरली मात्र वेगाने वाहणाऱ्या पाण्यात दोघीजणी बुडू लागल्या. त्यांना वाचविण्यासाठी भाऊ ज्ञानेश्वरने याने पाण्यात उडी मारली.

सांडव्या जवळ जोरजोरात आवाज आल्याने स्थानिक युवक साईराज संतोष रायरीकर व करण बाबुराव चव्हाण सांडव्यात उड्या मारत बुडणाऱ्या अनुसया व मयुरी यांना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बाहेर काढले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. परंतु या ठिकाणी मयत ज्ञानेश्वर मिळून न आल्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली गेली. दरम्यान, पानशेत पोलिस चौकीचे पोलिस हवालदार पकंज मोघे, अंमलदार कांतीलाल कोळपे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सह्याद्री आपत्ती व्यवस्थापनचे पथक तसेच पुणे महानगर प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले.

आपत्ती व्यवस्थापनचे तानाजी भोसले, चोंडे, संदीप सोलसकर व आबाजी जाधव तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी एकाच वेळी सांडव्यात उतरून दोन्ही बाजूला ज्ञानेश्वर याचा शोध सुरू केला. दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापनचे कार्यकर्ते संदीप सोलकर यांना सांडव्याच्या एका बाजूला खोल पाण्यात ज्ञानेश्वरचा मृतदेह सापडला. मृतदेह बाहेर काढून तीरावर आणला. शवविच्छेदनासाठी मृतदेह वेल्ह्याच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply