Pune : सिरम कंपनीने बंद केलेला शिवेचा रस्ता ग्रामस्थांच्या पवित्र्यामुळे खुला

हडपसर - साडेसतरा नळी मांजरी बुद्रुक हद्दीवरील डीपी व शिवेचा रस्ता येथील सिरम कंपनी व्यवस्थापनाने पत्रे आडवे लावून बंद केला होता. नागरिकांनी हा रस्ता कंपनीने खुला करावा, अशी मागणी करीत आंदोलनाचा पवित्र घेतला. दरम्यान, आमदार चेतन तुपे यांच्या मध्यस्थीनंतर तुर्त रस्त्यावरील अडथळा हटविण्यात आला असून या ठिकाणाहून वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

साडेसतरानळी दांगट वस्ती येथून सोलापूर रस्त्याच्या दिशेने साडेसतरानळी व मांजरी बुद्रुक गावांच्या शिवेचा रस्ता जात आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने सिरभ कंपनीच्या मालकीची जागा आहे.

कंपनी व्यवस्थापनाने आज अचानकपणे साडेसतरानळी गावाकडून येणाऱ्या मार्गावर पत्रे आडवे लावून रस्ता बंद केला होता. तसेच, आतील बाजूने रस्त्याचे खोदकाम करण्यात आले होते. याबाबतची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी येऊन या कामाला विरोध केला. पोलिसांनी याठिकाणी बंदोबस्त लावला होता.

दरम्यान, अमदार चेतन तुपे यांनी घटनास्थळी भेट दिली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांच्या कार्यालयात रस्त्याबाबत चर्चा होऊन तूर्तास रस्ता खुला करण्यात आला आहे. अधिकारी ब्रम्हा नायडू, माजी सरपंच संदीप तुपे, बाजारसमितीचे माजी उपसभापती भूषण तुपे, माजी उपसरपंच रुपेश तुपे, राजू तुपे, महेश तुपे, काळुराम जगताप यांच्यासह काही ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

आमदार तुपे म्हणाले, "हा रस्ता दोन्ही गावांच्या शिवेवरील नकाशावर असलेला रस्ता आहे. तेथे यापूर्वी व आताही निधी टाकून काम करण्यात आले आहे. पथदिवेही बसविण्यात आले आहेत.

हा रस्ता सध्या वाहतूकीत आहे. पुनावाला यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार सध्या हा रस्ता खुला करण्यात आला आहे. उद्या पुन्हा मिटींग होणार असून त्यावर निश्चित पर्याय निघेल.' कंपनीचे अधिकारी ब्रम्हा नायडू व पुनावाला यांचे सचिव अली हसन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply