Pune Encroachment Action : फर्ग्युसन रस्त्यावर अतिक्रमण कारवाई

पुणे : नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्याच्या (फर्ग्युसन महाविद्यालय -एफसी रस्ता) दोन्ही बाजूने पादचारी मार्गावर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले असले तरी कारवाईकडे कानाडोळा केला जात होता.पण त्याविरोधात प्रशासनाकडे तक्रार आल्यानंतर आता त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन विभागाने मोहीम सुरु केली आहे. कारवाई अडीच हजार चौरस फुटाचे बांधकाम पाडले. ११ पथारी, ४ स्टॉल, ७ शेड, ४ काऊंटरवर कारवाई केली.

एफसी रस्ता हा फेरीवाल्यांसाठी प्रतिबंधित रस्ता असला तरी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून त्याची कडक अंमलबजावणी केली जात नाही. या रस्त्यावरील पथारी व्यावसायिकांची संख्या कायम वाढत आहे. अनेकांनी थेट पादचारी मार्गावरच छोटे स्टॉल टाकून कपडे, पादत्राणे, ज्वेलरी तसेच सौंदर्य प्रसाधनांची विक्री करतात. यातील अनेक व्यावसायिकांची महापालिकेकडे कोणतीही नोंद नाही.

या स्टॉलच्या भोवती प्रचंड गर्दी होत असल्याने आग लागल्यास किंवा अन्य दुर्घटना घडल्यास अनर्थ ओढवू शकतो. तसेच काही संघटनांनी प्रशासनाकडे या व्यावसायिकांच्या वर्तनाबद्दल तक्रार केली आहे. त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा आम्ही कारवाई करू असा इशारा दिल्याने आता प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे.

उपायुक्त माधव जगताप म्हणाले, ‘फर्ग्युसन रस्त्यावरील बेकायदा व्यावसायिकांच्या विरोधात तक्रारी आलेल्या आहेत. रस्त्यावरील काही परवानाधारकांनी कारवाई विरोधात न्यायालयात अर्ज करून स्थगिती आणली आहे. हे व्यावसायिक वगळून इतर सर्व व्यावसायिकांवर कारवाई केली जाईल. परवानाधारक स्टॉल्सचे योग्य जागी पुनर्वसन केले जाईल.

‘‘फर्ग्युसन रस्त्यावर बेकायदेशीपणे व्यवसाय केला जात आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे. त्यामुळे याविरोधात महापालिकेकडे व पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज कारवाई झाली. अशा प्रकारे शहरातील इतर भागातही कारवाई करावी अशी मागणी आहे.’’



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply