Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांचा धुमाकूळ कायम ; वेगवेगळ्या गुन्ह्यांत तीन जणांची ६५ लाखांची फसवणूक

Pune Cyber Crime : विमानतळावर पकडण्यात आलेल्या कुरियरमध्ये अमली पदार्थ, बनावट पारपत्र किंवा परदेशी चलन सापडल्याची बतावणी करून केंद्रीय यंत्रणांकडून चौकशीची भीती घालत नागरिकांना फसविण्याचे प्रकार वाढत आहेत. सायबर चोरट्यांनी नुकतीच वेगवेगळ्या गुन्ह्यांत तीन जणांची ६५ लाख सहा हजार रुपयांची फसवणूक केली.

सायबर चोरटे आधी कुरीयरमध्ये अवैध वस्तू सापडल्याची बतावणी करतात. त्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) किंवा अमली पदार्थ विरोधी विभागाकडून (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) कारवाईची भीती घातली जाते. मग चौकशी आणि कारवाई टाळण्यासाठी दंड भरण्यास सांगितले जाते.

Nanded News : नांदेडमध्ये कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडलं; तरुण पोलिसांच्या ताब्यात

खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या शिवाजीनगर भागातील एका नागरिकाच्या मोबाईलवर सायबर चोरट्यांनी २१ एप्रिल रोजी संपर्क साधला. तुमच्या नावाने मुंबईहून थायलंडला पाठविण्यात येणाऱ्या फेडेक्स कुरीयरच्या पाकिटात पाच पारपत्र आणि अमली पदार्थ सापडल्याची बतावणी करण्यात आली. मग काळ्या पैशाच्या व्यवहारात तुमच्यावर मुंबई गुन्हे शाखेकडून कारवाई होण्याची शक्यता असल्याची भीती घालण्यात आली. त्यानंतर घाबरलेल्या नागरिकाकडून ४९ लाख ३७ हजार रुपये उकळण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या नागरिकाने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कुलकर्णी या प्रकरणी तपास करीत आहेत.

सिंहगड रस्ता परिसरातील एका तरुणाची ऑनलाइन टास्कच्या आमिषाने ११ लाख २१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. तरुणाने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सोशल मीडियावरील व्हिडिओ आणि जाहिरातींना लाईक मिळवून दिल्यास चांगला परतावा मिळेल, घरातून कामाची संधी अशी आमिषे दाखवून तरुणाला जाळ्यात ओढण्यात आले. मग त्याला बँक खात्यात ११ लाख २१ हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी संपर्कच साधला नाही.

ज्येष्ठ महिलेची फसवणूक

बँक खाते अद्ययावत करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेची सायबर चोरट्यांनी पाच लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केली. या महिलेने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सायबर चोरट्यांनी महिलेशी मोबाईलवर संपर्क साधला. बँक खातेदारांची माहिती संकलित करीत असून खाते अद्ययावत न केल्यास बंद पडेल अशी भीती घालण्यात आली. मग महिलेकडून बँक खात्याची गोपनीय माहिती घेण्यात आली. याचा गैरवापर करून चोरट्यांनी खात्यातून ऑनलाइन रक्कम काढून घेतली.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply