Pune Crime : वाघोलीत लॉजमध्ये वेश्याव्यवसाय, चार तरुणी ताब्यात

पुणे - वाघोली परिसरातील एका लॉजवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी बांगलादेशी तरुणीसह चौघींना ताब्यात घेतले. याप्रकरणी लॉजच्या व्यवस्थापकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी लिंबाजी सखाराम वाघमारे (वय २९, रा. आळंदी फाटा, लोणीकंद) आणि प्रवीण शेखर पुजारी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. वाघमारे याला अटक केली असून, दुसऱ्या आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. याबाबत पोलिस हवालदार मनीषा पुकाळे यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाघोली परिसरात उबाळे नगरमधील जयभवानी लॉजवर वेश्याव्यवसाय चालविण्यात येत आहे, अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यावर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यावेळी लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी एक मार्च रोजी या लॉजवर छापा टाकला. या कारवाईत एका बांगलादेशी तरुणीसह पश्चिम बंगालमधील तीन तरुणींना ताब्यात घेतले. न्यायालयाच्या आदेशानुसार पीडित तरुणींना हडपसरमधील निरीक्षणगृहात ठेवण्यात आले.

आरोपी वाघमारे आणि पुजारी यांनी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तर, आरोपी वाघमारे याला लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *