Pune Covid Center Scam Case : पुणे जम्बो कोविड सेंटर भ्रष्टाचार प्रकरणी राजू साळुंखेंना अटक, किरीट सोमय्यांनी ट्वीट करत सांगितले...

Pune News: पुण्यातील जम्बो कोविड सेंटर भ्रष्टाचार प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी राजीव साळुंखे यांना अटक केली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. राजीव साळुंखे हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि सुजित पाटकर यांचे पार्टनर आहेत.

किरीट सोमय्या यांनी आज ट्वीट करत सांगितले की, 'पुण्यातील शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटर भ्रष्टाचार प्रकरणात राजू साळुंखेला अटक झालेली आहे. अजून तीन भागीदार फरार आहेत. डॉ. हेमंत गुप्ता, संजय शहा आणि संजय राऊतांचे पार्टनर सुजित पाटकर फरार असून त्यांना अटक होणे बाकी आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बोगस कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. या कोविड सेंटरमध्ये तीन रुग्णांचा मृत्यू झाला होता. आता कारवाई तर होणारच.'

या भ्रष्टाचार प्रकरणी संजय राऊत यांचे भागीदार सुजित पाटकर यांना अटक करा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. या भ्रष्टाचार प्रकरणी आज शिवाजीनगर पोलिसांनी राजीव साळुंखे यांना अटक केली. राजीव साळुंखे आणि सुजित पाटकर हे लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे भागीदार आहेत. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात राजीव साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी लाईफ लाईन कंपनीच्याविरोधात आधीच गुन्हा दाखल केला आहे.

भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी मागच्या महिन्यात 10 एप्रिल रोजी जम्बो कोविड सेंट्रर भ्रष्टाचार प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. जम्बो कोविड सेंटर भ्रष्टाचार प्रकरणी किरीट सोमय्या यांनी भारतीय दंड संहिता कलम 420, 405, 406, 463, 464, 465, 470, 471 आणि 34 अंतर्गत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली होती. याप्रकरणी लाईफलाईन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिसकडून दिले गेलेले कागदपत्र बनावट असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी 5 फेब्रुवारी रोजी ट्वीट करत संजय राऊत भागिदार असलेल्या आणि अस्तित्वात नसलेल्या लाइफलाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिस या कंपनीला कोविड सेंटरचे कंत्राट देऊन तब्बल 100 कोटींचा जम्बो कोविड घोटाळा करण्यात आल्याचा आरोप केला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply