Pune Bus Fire: पुण्यात आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर? मिनी बस अपघातात चौघांचा बळी; संघटना आक्रमक!

 

Pune Bus Fire Incident Today: पुणे शहराची ओळख अलिकडच्या काळात आयटी कंपन्यांचं शहर अशी झाली आहे. अनेक बड्या कंपन्यांनी हिंजेवाडी भागात आपली आलिशान कार्यालयं थाटली आहेत. या कंपन्यांचा कर्मचारी वर्ग पुणे, पिंपरी-चिंचवड, निगडी अशा वेगवेगळ्या ठिकाणी राहतो. कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी काही ठिकाणी या कंपन्यांचीच वाहतूक व्यवस्था असून काही कंपन्यांनी इतर व्यावसायिकांना हे काम सोपवलं आहे. पण बुधवारी सकाळी हिंजेवाडीत अशाच एका मिनी बसने पेट घेतल्यानं झालेल्या दुर्घटनेनंतर या कर्मचाऱ्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

चालत्या बसनं पेट घेतला, चौघांचा होरपळून मृत्यू

हिंजेवाडीतील आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नेणाऱ्या एका मिनी बसनं चालू अवस्थेत पेट घेतला. हिंजेवाडी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या फेज वन येथे सकाळी ७.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. प्राथमिक चौकशीनुसार या मिनीबसमध्ये व्योमा ग्राफिक्स कंपनीचे १४ कर्मचारी प्रवास करत होते. त्यापैकी चौघांचा होरपळून मृत्यू झाला, असं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात नमूद केलं आहे.

कशी घडली दुर्घटना?

हिंजेवाडी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनी बसमधून कर्मचाऱ्यांना घेऊन जात असताना चालकाच्या पायाजवळ अचानक आग लागली. यात चालकालाही पायाला भाजू लागलं. मिनी बसच्या पुढच्या भागात लागलेली ही आग हळूहळू मागच्या भागाकडे सरकू लागली होती. हे पाहून चालक, त्याच्या बाजूची व्यक्ती आणि मधल्या भागातील प्रवासी अशा १० जणांनी मिनी बसमधून बाहेर उडी घेतली. पण मागच्या बाजूला बसलेल्या चौघांना बाहेर पडता आलं नाही. पुढे ही मिनी बस रस्त्यावरील दुभाजकाला जाऊन धडकली.

सुभाष भोसले, शंकर शिंदे, गुरुदास लोकरे व राजू चव्हाण अशी मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या दुर्घटनेतून वाचलेल्या प्रवाशांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रूबी रुग्णालयात उपचार चालू

दरम्यान, या दुर्घटनेतील जखमींवर हिंजेवाडीतील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार चालू आहेत. “जखमींपैकी दोघांना ४० टक्के भाजलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. एका व्यक्तीला २० टक्के भाजलं आहे तर आणखी एका व्यक्तीला ५ टक्के भाजलं आहे. किरकोळ जखमांसह एका प्रवाशाची प्रकृती स्थिर आहे. आमच्या टीमकडून सर्वोच्च दर्जाची आरोग्य सुविधा जखमींना पुरवली जात आहे”, अशी माहिती रुबी हॉल क्लिनिकचे सीओ डॉ. सुधीर राय व सीईओ बेहराम खोदाजी यांनी दिली.

आयटी कर्मचारी संघटना आक्रमक

दरम्यान, या दुर्घटनेनंतर आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संघटना आक्रमक झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांचं सेफटी ऑडिट केलं जावं, अशी मागणी या संघटनांकडून करण्यात आली आहे. फोरम ऑफ आयटी एम्प्लॉईजचे पवनजीत माने यांनी यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली आहे.

“या अशा वाहनांच्या चालकांकडे अशा आणीबाणीच्या प्रसंगी काय करायला हवं याचं कौशल्यच नसतं. आधी सर्व कंपन्यांमध्ये त्यांची स्वत:ची वाहतूक सुविधा होती. पण नंतर आर्थिक मुद्द्यावर अनेक कंपन्यांनी अशी सुविधा बंद केली. यातल्या बहुतांश कंपन्यांनी हे काम बाहेरच्या व्यावसायिकांना दिलं आहे. पण त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा कायम आहे”, असं माने म्हणाले. “या वाहनांमधील इमर्जन्सी गेट किंवा अग्निशमन यंत्रणा याविषयी कर्मचारी पूर्णपणे अनभिज्ञ असतात. वाहनांमधील अशा गोष्टींची नियमितपणे चाचणी घेतली जायला हवी”, असंही माने म्हणाले.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply