Pune : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर टेलर पलटी; चार तास वाहतूक कोंडी

मंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भोरवाडी- अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथे शुक्रवारी (ता.५) सकाळी सात वाजता पुण्याहून नाशिककडे जाणारा चाळीस फूट लांबीचा टेलर (एच आर ४७ सी २३१८) रस्त्यातच मध्यभागी पलटी झाला.

त्यामुळे पुणे व नाशिकला जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूने एक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या.मंचर पोलिसांनी सकाळी नऊच्या सुमारास टप्प्याटप्प्याने एकेरी वाहतूक सुरू केली त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली. सकाळी अकरापर्यंत टेलर रस्त्यातुन बाजूला करण्यात यश आले नव्हते.

पुण्याहून नाशिककडे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने भोरवाडीच्या पुलानजीक टेलर पलटी झाल्याचा मोठा आवाज आला. आवाज ऐकून परिसरात राहणारे दिनेश खुडे, शुभम खुडे, शैलेश भोर, बंटी भोर,समीर भोर, प्रवीण भोर, दिपक भोर आदी नागरिक मदतीसाठी धावून आले. चालक व्यवस्थित होता.

पण सदर टेलर रस्त्यातच पडल्याने वाहतूक कोंडी वाढत गेली. स्थानिक नागरिकांनी मंचर पोलिसांना सदर घटना कळविली. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी ताबडतोब पोलीस नाईक तुकाराम मोरे,

हेमंत मडके, सोमजित गवारी, अविनाश दळवी, अभिषेक कवडे, धनेश मांदळे आदी पोलीस पथक घटनास्थळी पाठवले. मोठ्या क्षमतेचा क्रेन उपलब्ध होण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्न करत आहे.

शुक्रवारी बुद्धपोर्णिमा सुट्टीचा दिवस असल्यामुळे व लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने चार चाकी, लक्झरी, एसटी गाड्या व इतर वाहनांची गर्दी वाढली होती. याचा फटका अनेक प्रवाशांना बसला असून त्यामध्ये लहान मुले, जेष्ठ नागरिक व महिलांचे अतोनात हाल झाले.

सदर कंटेनर नेमका कधी बाहेर काढता येईल. याविषयी अजून निश्चित माहिती उपलब्ध झाली नाही. मंचर-घोडेगाव मार्गे पेठ तसेच अवसरी खुर्द, गावडेवाडी मार्गे राजगुरुनगर अशी पर्यायी मार्गाची निवड काही वाहनचालकांनी केली.

दरम्यान महामार्ग विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अशोक पिंपळे, पोलीस नाईक सचिन डोळस, जयंत कोरडे, भिमा आहेर वाहतूक कोंडी पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न करत होते.

“पुण्याहून नाशिककडे जाणारी कार टेलरसमोर होती. भोरवाडी येथे असलेला स्पीडब्रेकर कारचालकाच्या लक्षात आला नाही. कार चालकाने जोरात ब्रेक दाबून कार जागेवर थांबविली.

चार ते पाच फुट मागून येत असलेले टेलर चालक सलिम सतार खान (वय ३० रा.ढोलवास ता.कामा जि.भरतपुर राजस्थान) यांनी ताबडतोब प्रसंगावधान राखून टेलरवर वेगावर नियत्रण आणण्याचा प्रयत्न केला त्यामध्येच टेलर उजव्या बाजूला पलटी झाला.

पण मोठा अपघात टाळला. कारमध्ये एकूण पाचजण होते. त्यांचे प्राण वाचवण्याची कामगिरी सलिम खान यांनी केली आहे.” अशी माहिती पोलीस नाईक तुकाराम मोरे यांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply