Pune Accident : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्धवट कामाचा नागरिकांच्या जीवाला धोका

किरकटवाडी : सिंहगड रस्त्याचे काम करत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्धवट कामांमुळे सातत्याने अपघात होत असून आज पुन्हा दुभाजकासाठी सोडलेल्या मोकळ्या जागेवरून घसरुन एक दुचाकी थेट पीएमपीच्या बसखाली गेली.

तरुणाने प्रसंगावधान राखून वेळीच उडी मारल्याने त्याचा जीव वाचला आहे. करण गुरुदत्त वाघमारे (वय 27, रा. कोल्हेवाडी, सिंहगड रोड) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नांदेड फाटा ते किरकटवाडी फाटा या दरम्यानचे सिंहगड रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्षभरापूर्वी करुन घेतले आहे मात्र दुभाजकासाठी एक ते दीड फुट रुंदीची मोकळी जागा सोडण्यात आलेली आहे.

दुभाजकासाठी सोडलेली ही फट अत्यंत धोकादायक असून वाहनचालकांना अंदाज न आल्याने सातत्याने अपघात होत आहेत. सुरक्षेसाठी या ठिकाणी कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्याने व दुभाजकाचेही काम रखडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा परिसरातील रहिवासी, नोकरदार, पर्यटक यांना महागात पडत आहे.

आज सकाळी सव्वा सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास करण वाघमारे हा तरुण पुण्याच्या दिशेने जात होता तर स्वारगेट वरुन बस रांजणे खामगावकडे चालली होती. बसचे चालक भरत झुरंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार 'तरुणाची दुचाकी घसरली व त्याने उडी मारली.

बसचा ब्रेक दाबून बस थांबवली परंतु तोपर्यंत दुचाकी घसरत बसखाली आली होती. बसमध्ये सात ते आठ प्रवासी होते.' या अपघाताची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अशोक तारु व सहाय्यक फौजदार दिलीप शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले होते.

हवेली पोलीस ठाण्यात पुढील कार्यवाही सुरू आहे. तरुणाच्या भावाने फोडल्या बसच्या काचा....... अपघात झाल्यानंतर जखमी तरुणाचा भाऊ एक तासानंतर घटनास्थळी आला व त्याने बसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या असे चालक भरत झुरंगे यांनी सांगितले.

वास्तविक पाहता बस योग्य बाजूने जात होती. तो तरुण स्वतःच घसरला व दुचाकी विरुद्ध बाजूला बसखाली आली. तरीही तरुणाच्या भावाने विनाकारण बसवर दगडफेक केली असे चालक झुरंगे यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply