Pune News : देहूरोड-निगडी मार्गावर धावत्या बसच्या टायरला आग; चालकाच्या सतर्कतेमुळे ३५ प्रवाशांचे वाचले प्राण

Pune : देहूरोड ते निगडी मार्गावर प्रवासी घेऊन जाणाऱ्या पीएमपीएमएल बसच्या टायरला अचानक आग लागल्याची घटना देहूरोड उड्डाणपुलाजवळ घडली. बसच्या टायरमधून धुर निघताना स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ बस चालकाला याची माहिती दिली. बस चालकाने प्रसंगावधान राखून तातडीने बस थांबवली आणि सर्व ३५ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.

नेमकं घडलं काय?

चालकाने तात्काळ बस थांबवून सर्व ३५ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेनंतर आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी सीओ फायर एक्स्टिंग्विशरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले आणि मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नागरिकांचा आरोप

दरम्यान, पीएमपीएमएलच्या सीएनजी बसगाड्या रस्त्यावर सुरू असल्या तरी त्यांची देखभाल योग्य प्रकारे केली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. बऱ्याच बसगाड्यांच्या टायरची स्थिती अत्यंत खराब असून, त्यांचे तांत्रिक दोष दूर करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचेही निदर्शनास आले.

'अशा नादुरूस्त बसेस रस्त्यावर आणू नयेत'

घटनेच्यावेळी परिसरात नागरिकांची मोठी उपस्थिती होती. त्यामुळे प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांकडून त्वरित मदत मिळाली. तसेच प्रवाशांचे प्राण वाचले. तसेच 'अशा नादुरूस्त बसेस रस्त्यावर आणू नयेत' अशी स्पष्ट मागणी प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply