Pune : वाहतुकीचा वेग वाढला; पण…

Pune : पुण्यातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे. उपलब्ध रस्ते, वहनक्षमता विचारात घेऊन वाहतूक पोलिसांनी गेल्या सहा महिन्यांपासून केलेल्या विविध उपाययोजनांमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत वाहतुकीचा वेग १०.५ टक्क्यांनी वाढला असून, वाहतूक पोलिसांनी महापालिका, तसेच विविध यंत्रणांशी समन्वय साधल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. वाहतुकीचा वेग वाढला असला, तरी शहरातील बहुतांश रस्त्यांवरून पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहेत. वर्दळीच्या चौकात रस्ता ओलांडणे हे जिकिरीचे ठरत आहे. अतिवेगामुळे शहरात गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. रस्ते अपघातात पुणे शहरात किमान एकाचा मृत्यू होत आहे. वाहतुकीचा वेग वाढविण्याबरोबरच पादचारी आणि वाहनचालकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. वाहतूक नियम धुडकाविणाऱ्या बेशिस्तांवर करण्यात येणाऱ्या कारवाईत सातत्य ठेवल्यास जरब बसेल, तसेच वाहतुकीला शिस्त लागेल.

कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलीस आणि महापालिका एकत्रित काम करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक पोलिसांनी शहरातील नगर रस्ता, सोलापूर रस्त्यांवर विविध उपाययोजना यशस्वी करून दाखविल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग वाढला. त्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांचा देखील आढावा घेऊन वाहतूक पोलिसांनी उपाययोजना केल्या. २६५ किलोमीटरच्या एकूण ३३ प्रमुख रस्त्यांची निश्चिती करून या रस्त्यांच्या सुधारणेसाठी वाहतूक पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये वाहतूक अभियांत्रिकी बदल, प्रमुख रस्त्यांवरील वळणे (राइट वा लेफ्ट टर्न) बंद करणे, तसेच ज्या भागात कोंडी होते, असे भाग निश्चित करून तेथील कोंडी हटविण्यासाठी अभियांत्रिकी बदल करणे, वाहतुकीस अडथळा ठरणारे पीएमपी थांबे हलविणे, खासगी बस, तसेच रिक्षा थांबे हलविण्यात आल्याने वाहतुकीचा वेग वाढला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply