Pune : पारव्यांना धान्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, वसूल केला इतक्या हजारांचा दंड !

Pune  : शहरातील पारवे तसेच कबुतरांकडून होणारा त्रास दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्याचे समोर आले आहे. नागरिकांनी पारव्यांना धान्य टाकू नये, असे आवाहन महापालिकेने केलेले असतानाही त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे.

महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्यांकडून महापालिकेने २८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. शहरातील विविध भागांतून ३८ प्रकरणांमध्ये हा दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिकेच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून पुन्हा धान्य देताना आढळणाऱ्या नागरिकांकडून वाढीव दंड घेण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे.

पारव्यांच्या तसेच कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतुंमुळे फुप्फुसाशी संबंधित आजार होतात. गेल्या काही महिन्यांमध्ये या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. असे असतानाही अनेक पक्षीप्रेमी नागरिक दररोज सकाळ संध्याकाळ पारव्यांना धान्य टाकत असल्याचे प्रकार ‘लोकसत्ता’ने समोर आणले होते. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी याची गंभीर दखल घेऊन पारव्यांना धान्य टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले होते. त्यानंतर यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Pimpri : पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले…

महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशानंतर घनकचरा व्यवस्थापन विभागाने पारव्यांना धान्य टाकणाऱ्या नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच त्यांना होणाऱ्या कारवाईची माहिती देण्यासाठी पथके तयार केली. ही पथके दररोज सकाळी आणि संध्याकाळी ज्या भागात पारव्यांना धान्य टाकले जाते, तेथे जाऊन पक्षीप्रेंमीमध्ये जनजागृती करत होते. महापालिकेने जनजागृती करणारे फलकही लावले होते.

जनजागृतीनंतरही पारव्यांना धान्य टाकणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करण्यास सुरुवात करण्यात आली. १ डिसेंबरपासून आतापर्यंत ३८ प्रकरणांमध्ये महापालिकेने २८ हजार रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.

कोठे झाली कारवाई ?

शहरातील कोथरूड, वारजे माळवाडी, नदीपात्र परिसर, अष्टभुजा घाट, नेने घाट परिसर तसेच स्वारगेट परिसर, सारसबाग परिसरात कबुतरे-पारवे बसतात तेथे धान्य टाकणाऱ्यांकडून पालिकेने दंड वसूल करण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे या नियमाखाली हा दंड घेतला जातो. या नियमाखाली पाचशे ते पाच हजार रुपयांचा दंड घेण्याची तरतूद आहे.

पारव्यांना धान्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. नागरिकांमध्ये जनजागृतीदेखील केली जात आहे. तसेच, शहरातील ज्या भागात पारव्यांचे, कबुतरांचे वास्तव्य आहे. अशा जागा शोधून ती ठिकाणे स्वच्छ करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे, असे घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply