Pune  : सावधान! झिकामुळे होऊ शकतो गंभीर आजार; पुण्यात एक रुग्ण गेलेला कोमात, देशातील पहिलीच घटना, डॉक्टरांचा दावा

Pune  : हडपसर येथील ६१ वर्षीय रुग्णाला जुलाब, उलट्या आणि ताप अशी लक्षणे आढळून आली. उपचारांनंतरही ताप आणि जुलाब कमी होत नव्हता. त्यातच प्रकृतीत गुंतागुंत निर्माण झाल्याने अतिदक्षता विभागात दाखल केले. त्यानंतर रुग्ण बेशुद्ध होऊन कोमात गेल्याने नेमका कोणता आजार आहे, याचा शोध डॉक्टरांनी सुरू केला. डॉक्टरांच्या शोधमोहिमेतून रुग्णाला ‘झिका’मुळे मेंदूज्वर (झिका मेनिंगोएन्सेफलायटीस) झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे रुग्ण कोमातून बाहेर आला असून, आता प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.

या घटनेमुळे ‘झिका’ विषाणूच्या संसर्गातून मेंदूज्वर आणि मेंदूशी निगडित आजार होऊ शकतात, असे समोर आले आहे. पुण्यात आढळून आलेला हा रुग्ण देशातील पहिलाच असण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. ‘झिका’मुळे मेंदूज्वर होणे ही दुर्मीळ घटना आहे. ब्राझील आणि अमेरिका या देशांमध्ये पूर्वी असे रुग्ण आढळले आहेत. या देशांमध्येही अशा प्रकारचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण दुर्मीळ असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले.

एकसष्ठवर्षीय पुरुषाला एक जुलैपासून ताप, जुलाब आदी लक्षणे दिसू लागली. त्यानंतर रुग्णावर हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले. ताप कमी होत नसल्याने तीन जुलैला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाचे वय जास्त असल्याने आणि मधुमेह, रक्तदाब, थायरॉइड आदी सहव्याधी असल्याने प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे रुग्णाला अतिदक्षता विभागामध्ये दाखल करून व्हेंटिलेटरवर उपचार सुरू करण्यात आले. रुग्णाला ‘झिका’ची लक्षणे असल्याचा संशय डॉक्टरांना आल्याने रक्त तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले. नमुने तपासणीसाठी पाठवले, त्याच दिवशी रुग्ण कोमात गेला.

Pune News : दुकानासमोर गाडी लावली, धाड..धाड..धाड तिघांकडून गोळीबार, पुण्यात आईस्क्रीम दुकान मालकावर हल्ला

‘एनआयव्ही’च्या अहवालात रुग्णाला ‘झिका’चे निदान झाले. त्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या तपासण्यांमध्ये मेंदूज्वर, किडनीसह अन्य अवयवांवर परिणाम झाल्याचेही दिसून आले. मेंदूज्वर झाल्याने रुग्णाच्या पाठीत पाणी जमा झाले होते. पाठीतील पाणी काढून तपासणी करण्यात आली. यामध्येही रुग्णाला ‘झिका’चा संसर्ग झाल्यावर शिक्कामोर्तब झाले.

‘रुग्णाला स्टेरॉइड्स आणि व्हेंटिलेटरवर उपचार देण्यात आले. अतिदक्षता विभागात एक आठवडा उपचार केल्यानंतर रुग्ण कोमातून बाहेर आला. सध्या रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे,’ अशी माहिती अतिदक्षता विभागाचे संचालक डॉ. झेड. ए. खान यांनी दिली.अतिदक्षता विभागातील डॉ. बाळासाहेब बांडे, न्यूरोलॉजिस्ट डॉ. पारस बोरसे, फिजिशियन डॉ. अपर्णा कोद्रे, डॉ. दिलीप माने आणि संसर्गरोग तज्ज्ञ अमित द्रविड यांनी रुग्णावर उपचार केले.

झिकातून मेंदूज्वर होणे ही दुर्मीळ घटना आहे. सध्या डेंगी आणि झिकाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. लक्षणे असलेल्या गर्भवती महिलांसह सर्व वयोगटातील नागरिकांनी तपासणी करणे आवश्यक आहे. या एकसष्ठ वर्षीय रुग्णाला सहव्याधी असल्याने प्रकृती चिंताजनक झाली का, याचा अभ्यास सुरू आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply