Vanraj Andekar Murder: पुणे माजी नगरसेवकाची हत्या, आंदेकर खून प्रकरणात पोलिसांची न्यायालयात महत्त्वाची माहिती

Pune: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरचा खून करण्यासाठी आरोपींनी परराज्यातून शस्त्रे आणली असून, त्यापैकी चार पिस्तुले, दहा काडतुसे आणि सहा दुचाकी व एक चारचाकी जप्त करण्यात आली आहे; तसेच वनराजचे वडील सूर्यकांत व भाऊ शिवम यांच्यासह नऊ प्रत्यक्षदर्शींकडे चौकशी करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी न्यायालयात दिली. त्यानंतर आंदेकर खून प्रकरणात त्याची सख्खी बहीण संजीवनी कोमकर, मेव्हणे जयंत व गणेश कोमकर, प्रकाश कोमकर आणि सोमनाथ गायकवाड यांच्या पोलिस कोठडीत १२ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली.

या प्रकरणी वनराजचे वडील बंडू ऊर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय ६८, रा. नाना पेठ) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी आतापर्यंत सोळा आरोपींना अटक केली असून, तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. आणखी चार जणांचा पोलिस शोध घेत आहेत. आरोपींपैकी आंदेकरची बहीण संजीवनी जयंत कोमकर (वय ४४), जावई जयंत लक्ष्मण कोमकर (वय ५२), गणेश लक्ष्मण कोमकर (वय ३७) व प्रकाश लक्ष्मण कोमकर (वय ५१, सर्व रा. नाना पेठ) आणि सोमनाथ सयाजी गायकवाड (वय ४१, मूळ रा. नाना पेठ, सध्या रा. आंबेगाव पठार, धनकवडी) यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Pune : पुणेकरांसाठी महत्त्वाचे! गणेशोत्सवानिमित्त ११ ते १८ सप्टेंबर 'या' रस्त्यांवर नो एंट्री, जाणून घ्या पर्यायी मार्ग

तपास अधिकारी वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद आणि सहायक सरकारी वकील योगेश कदम यांनी गुन्ह्याच्या तपासातील प्रगती अधोरेखित करताना आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. गुन्ह्याचे ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरण व घटनास्थळी सापडलेला मुद्देमाल तपासणीसाठी पाठविला आहे. जप्त केलेल्या वाहनांच्या मालकाचा पत्ता शोधण्यासाठी ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले. आरोपींतर्फे ॲड. पुष्कर पाटील, ॲड. आर. आर. पाटील, ॲड. ऋतुराज पाटील आणि ॲड. विश्वजित पाटील यांनी बाजू मांडताना आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली.

गुन्ह्यात कलमवाढ

गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ४९, ५४, १०९, १११ (१) (२) (३) (४) नुसार कलमवाढ करण्यात आली आहे. हे आरोपी मुख्य सूत्रधार असून, संपत्ती व वर्चस्ववादातून त्यांनी अन्य आरोपींच्या मदतीने पूर्वनियोजित कट रचून निर्घृणपणे वनराजचा खून केला आहे. त्यासाठी त्यांना पैसे, हत्यार, वाहन पुरवून गुन्ह्यात अप्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या आरोपींचा शोध घ्यायचा आहे. आरोपींच्या मोबाइलची तांत्रिक तपासणी करायची आहे. त्यासाठी आरोपींच्या कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी सरकार पक्षाने केली. न्यायालयाने ती मान्य केली.

सोमनाथ, गणेश ‘ए कंपनी’चेच सदस्य

या प्रकरणात तक्रारदार बंडू आंदेकर यांची स्वतंत्र गुन्हेगारी टोळी असून, खून प्रकरणात अटक आरोपी सोमनाथ गायकवाड आणि गणेश कोमकर या टोळीचे (ए कंपनी) सदस्य होते. त्यांनी एकत्रितपणे यापूर्वी अनेक गुन्हे केले आहेत, असेही पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply