Dahi Handi Celebrations In Pune : नियमभंगाचेही थरावर थर!

Pune  : कानाचा पडदा फाडणाऱ्या ध्वनिक्षेपकांच्या दणदणाटी भिंती, डोळ्यांना त्रास देणारे प्रकाशझोत आणि बऱ्याच ठिकाणी अघोषित रस्ताबंदीमुळे वाहनांसाठी वाट काढताना झालेली पंचाईत, असे नियमभंगाचे थरावर थर रचले जात असताना हताशपणे पाहण्यापलीकडे मंगळवारी सामान्य पुणेकरांच्या हाती काहीच उरले नाही. दहीहंडी उत्सवामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहाला भरते आले असले, तरी शहरात काही ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना या अतिउत्साहाचा फटका बसला.

दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पुण्यात मंगळवारी दुपारीच सुरू झाला. काही ठिकाणी तर सोमवारी रात्रीच दणदणाटाला सुरुवात झाली होती. दुपारी ढोल-ताशा पथकांचे स्थिरवादन आणि नंतर रात्री उशिरापर्यंत डीजे यामुळे आसमंतात कर्णकर्कश आवाज भरून राहिला होता. अनेक ठिकाणच्या ध्वनिवर्धकांच्या भिंतींसमोरून जाताना तर संपूर्ण शरीराला हादरे बसत असल्याचा अनुभव सर्वसामान्यांना येत होता.

शहरातील मध्य भागातील वाहतूक वळविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी दोन दिवस आधीच जाहीर केले होते. मात्र, या व्यतिरिक्तही उपनगरांत अनेक ठिकाणी अगदी गल्ली-बोळांतही अघोषित रस्ताबंदी होती. एकेका गल्लीत दोन किंवा त्याहून अधिक मंडळे उत्सव साजरा करत असल्याने या ठिकाणी राहणाऱ्या अनेकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले.

Mumbai Goa Highway : बेजबाबदार कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

घातक प्रकाशझोतांवर बंदी आहे, असे आदेश पोलिसांनी काढूनही अनेक ठिकाणी असे झोत टाकणारे लेझर बीम प्रकाश प्रदूषण करत होते. या झोतांसाठी उभारले जाणारे मनोरे क्रेन किंवा एक्स्कव्हेटरच्या साह्याने चढविले गेले. काही मंडळांनी यासाठी सोमवारी रात्रीच तयारी सुरू केली. मध्यरात्रीनंतर लोखंडी सांगाडे उभे करून रस्ते बंद केले.

कारवाई होणार का?

दहीहंडी उत्सवात घातक लेझर दिव्यांवर बंदी घालण्याचे आदेश सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिले होते. परंतु, चौकाचौकांत दहीहंडी साजरी करणाऱ्या अनेक मंडळांनी हे आदेश धुडकावून लावल्याचे निदर्शनास आले. ध्वनिक्षेपकांच्या भिंती उभारून ध्वनिपातळीच्या मर्यादेचेही उल्लंघन झाल्याचे आढळले. पोलिसांचे आदेश धुडकाविणाऱ्या अशा मंडळांविरुद्ध कारवाई होणार का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

ज्या मंडळाकडून ध्वनिमर्यादेचे उल्लंघन झाले आहे आणि लेझर प्रकाशझोतांचा वापर करण्यात आला आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. यासाठी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांना व्हिडिओ चित्रीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चित्रीकरण पाहून पुढील कारवाई करण्यात येईल. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply