नेपाळमध्ये २२ प्रवाशांसह विमान बेपत्ता; ४ भारतीयांचा समावेश, शोध मोहिम सुरु

नवी दिल्ली : नेपाळची खासगी विमान कंपनी तारा एअरचे विमान रविवारी बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. या विमानाचा वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला आहे. तारा एअरच्या या छोट्या प्रवासी विमानात एकूण २२ प्रवासी असल्याची माहिती आहे, त्यापैकी चार भारतीय असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, दोन इंजिन असलेले तारा एअर 9 NAET हे विमान पोखराहून जोमसोमला जात असताना वाटेत नियंत्रण कक्षाशी त्याचा संपर्क तुटला.

या विमानात  एकूण २२ प्रवासी होते, त्यात चार भारतीय, तीन जपानी आणि बाकीचे नेपाळी नागरिक होते. विमानात तीन क्रू मेंबर्स होते. राजधानी काठमांडूपासून ८० किमी उत्तर-पश्चिमेस असलेल्या स्थानिक वेळेनुसार सकाळी ९.५५ वाजता विमानाने पर्यटन केंद्र पोखरा येथून जोमसोमकडे उड्डाण केले होते, पण मुस्तांगच्या टेकआउट भागात पोहोचल्यानंतर विमानचा संपर्क तुटला.

हे विमान मुस्तांग जिल्ह्यातील जोमसोम येथे आकाशात दिसले, त्यानंतर ते धौलागिरीच्या पर्वतांकडे वळले आणि तेव्हापासून याबद्दल काहीही माहिती नाही, अशी माहिती मुख्य जिल्हा अधिकारी नेत्रा प्रसाद शर्मा यांनी दिली. बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी गृह मंत्रालयाने तातडीने दोन खासगी हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. शोध मोहिमेसाठी नेपाळ लष्कराचे हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले आहे.

हेलिकॉप्टरने परिसरात शोधमोहीम राबविली जात आहे. नेपाळी लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, नेपाळी लष्कराचे एमआय-१७ हेलिकॉप्टर घेऊन ते मुस्तांगला रवाना झाले असून, हे विमान येथेच कोसळले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply