पिंपरी-चिंचवड : सातवा वाढदिवस ५१ किलोमीटर सायकलिंग करून साजरा; इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या मुलाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

पिंपरी-चिंचवड : इयत्ता दुसरीत शिक्षण घेणाऱ्या मुलाने त्याचा ७ वा वाढदिवस ५१ किलोमीटर सायकलिंग करून साजरा केला. रिआन देवेंद्र चव्हाणच्या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. रिआन अवघ्या तीन वर्षांचा असताना त्याने सिंहगड ट्रेक पूर्ण करत अनेक किल्ल्यांची चढाई केली आहे.

रिआन देवेंद्र चव्हाण हा देहूरोडच्या केंद्रीय विद्यालय नंबर एकच्या शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिक्षण घेत आहे. रिआनला लहानपणापासूनच ट्रेकिंग, धावणे आणि सायकलिंगची आवड आहे. रिआनचा १२ फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता, तो त्याने ५१ किलोमीटर सायकलिंग करून साजरा केला. रिआन तीन वर्षांचा होता तेव्हा त्याने सिंहगड ट्रेक पूर्ण केला होता, अशी माहिती त्याचे वडील देवेंद्र चव्हाण यांनी दिली.

रिआनने आत्तापर्यंत तिकोणा, विसापूर, लोहगड, शिवसनेरी, तोरणा, मोहन दरी किल्ल्यांवर चढाई केली आहे. रिआनला समाजसेवा करायला खूप आवडते. मोठा होऊन त्याला देशसेवा करायची असून भारतीय सैन्यात जायचे आहे. शाळेत धावण्याच्या सहा मॅरेथॉन त्याने पूर्ण केल्या आहेत. पिंपरी-चिंचवड पाच किलोमीटरची मॅरेथॉन त्याने ३४ मिनिटांत पूर्ण केली होती. रिआनचे वडील पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात पोलिस निरीक्षक आहेत, तर आई पुण्याच्या भारतीय प्राणी सर्वेक्षण, पश्चिम प्रादेशिक केंद्र पुणे येथे शास्त्रज्ञ-ई पदावर कार्यरत आहेत.

वाढदिवशी सायकलवर या ठिकाणी केली भ्रमंती

रिआनने सी.एम.ई, खडकी, लालमहाल, शनिवारवाडा, दगडूशेठ गणपती, डेक्कन, औंध आणि निगडी अशी भ्रमंती केली होती. त्याने पुणे दर्शन केले म्हटले तरी वावगे ठरणार नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply