Phule University Result: पत्रकारिता अभ्यासक्रमांच्या निकालात चुकाच चुका; सावित्रीबाई फुले विद्यापीठातील प्रकार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑक्टोबर २०२३ मध्ये घेतलेल्या एमजेएमसी ( जनसंज्ञापन आणि पत्रकारिता) परीक्षांच्या निकालात अनेक चुका झाल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

विद्यापीठाने जाहीर केलेल्या ऑनलाइन निकालात सर्वच विद्यार्थी काही विषयांत सरसकट नापास झाल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यापीठाकडून निकालपत्र बनविण्याचे काम खासगी संस्थांना दिले जाते.

संबंधित खासगी संस्थेने महाविद्यालयांनी पाठविलेले गु़ण निकालपत्र बनविताना विचारातच घेतले नसल्याने एकाच विषयात सरसकट सर्व विद्यार्थी नापास झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत असा प्रकार झाला असल्याचे समजले आहे.

ही बाब विद्यापीठाच्या निदर्शनास परीक्षा  समिती अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित अधिकारी रजेवर घेतल्याचेही समजते. नाशिकमधील एचपीटी, केटीएचएम आणि भोसला तसेच पुण्यातील महाविद्यालयांच्या बाबतीत या चुका झाल्या आहेत.

अंतर्गत आणि बहिर्गत गु़ण विचारात घेऊन विद्यापीठाने सुधारित निकाल जाहीर करावा, अशी मागणी पुणे व नाशिकमधील विद्यार्थ्यांनी केली आहे. काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या हेल्पलाइन वर संपर्क साधूनही विद्यार्थ्याना समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याच्या तक्रारी आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply