Palghar Earthquake News: महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात जाणवले भूकंपाचे धक्के नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

पालघर: पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्याला बुधवारी (ता. ३) पुन्हा भूकंपाचे धक्के बसले. ३.४ रिश्टर स्केलचे हादरे बसल्याचे सांगण्यात आले. धानिवरी येथील शेतकरी शंकर गोरखना यांच्या घराच्या भिंती मागील भूकंपात भेगा पडल्या होत्या. आजच्या भूकंपात ती भिंत कोसळून नुकसान झाले. गेले काही महिने भूकंपाचे धक्के जाणवले नव्हते; मात्र नवीन वर्षात पुन्हा धरणीकंप जाणवू लागल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

डहाणू, तलासरी, धुंदलवाडी, जव्हार या भागांत हे धक्के जाणवले. आज दुपारी १.४७ वाजता ३.४ रिश्टर स्केलचा हादरा बसला. डहाणू तहसीलदार अभिजित देशमुख यांनी माहिती दिली की, या धक्क्यांमुळे अजून मोठ्या प्रमाणात नुकसान, हानीची माहिती समोर आली नाही. महसूल अधिकारी व कर्मचारी यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी देखील काळजी घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले.

गेल्या काही महिन्यांपासून भूकंपाचे धक्के बंद होते. त्यामुळे अनेक दिवस नागरिक निर्धास्त होते. पुन्हा या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी डहाणू, तलासरी परिसरात भूकंपसत्र सुरू होते. त्यावेळी अनेक नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले होते. त्यासाठी प्रशासनाने उपाययोजना केल्या होत्या. नागरिकांसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली होती. नवीन वर्ष सुरू होताच पुन्हा भूकंपाचे हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply