Pahalgam Terror Hits Tourism : दहशतवादी हल्ल्याचा फटका पर्यटनाला; विमानाच्या तिकीट दरात घसरण, पण श्रीनगरहून परतीचा प्रवास महाग

Pahalgam Terror Hits Tourism : पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यामुळे एप्रिल आणि मे महिन्याच्या पर्यटनावर आता भीतीचे सावट आहे. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अनेकांनी जम्मू आणि काश्मीरला जाण्याचा बेत रद्द केला आहे. त्यामुळे पर्यटनाचा हंगाम असतानाही आता श्रीनगरला जाणाऱ्या विमानाच्या तिकीट दरात जवळपास ६० टक्क्यांची घसरण झाली आहे. मंगळवारी (२२ एप्रिल) पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला तर १७ जण जखमी आहेत.

जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर हे एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. दहशतीच्या सावटामुळे पर्यटनाच्या हंगामावर आता टांगती तलवार आहे. भारताच्या अनेक शहरांतून श्रीनगरला विमाने उड्डाण घेत असतात. मात्र हल्ल्याच्या बातमीनंतर अनेकांनी तिथे जाणे आता टाळले आहे.

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली

जम्मू आणि काश्मीरसाठी उन्हाळ्यातील महिने महत्त्वाचे ठरत असतात. शाळांना सुट्ट्या लागल्यानंतर अनेक लोक कुटुंबासह थंड हवेचे ठिकाण म्हणून जम्मू-काश्मीरला जाणे पसंत करतात. या काळातील पर्यटनावर जम्मू आणि काश्मीरची अर्थव्यवस्था अवलंबून असते.

विमानाच्या तिकीटाच्या किंमती या परिस्थितीजन्य असतात. २३ एप्रिल रोजी मुंबईहून श्रीनगरला जाण्यासाठी विमानाच्या तिकीटाचा दर ११,९९१ रुपये एवढा होता. मात्र मंगळवारी दुपारी झालेल्या हल्ल्यानंतर आता २४ एप्रिल ते २७ एप्रिलपर्यंत विमानाचे दर ४,८८० रुपये इतके दाखवत आहेत. मुंबईसह इतर शहरांतून जाणाऱ्या विमानांच्या तिकीट दरातही मोठी घसरण झाली आहे. याबाबतची आकडेवारी इंडिया टुडेने दिली आहे.

अहमदाबादहून निघणाऱ्या विमानांच्या तिकीटाची किंमत ५३ टक्के, चेन्नई ५१ टक्के, बंगळुरू ३६ टक्के, कोलकाता २२ टक्के आणि दिल्ली २० टक्के इतकी घसरण तिकीट दरात झालेली पाहायला मिळत आहे.

याउलट श्रीनगरहून येणाऱ्या विमानांचे तिकीट दर मात्र जैसे थे आहेत. पहलगामध्ये मंगळवारी हल्ला झाल्यानंतर पुढच्या सहा तासांत ३,३३७ प्रवाशी श्रीनगरमधून बाहेर पडले, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply