Nylon Manja : नायलॉन मांज्याने आयुष्याचा दोर कापला, राज्यात तिघांचा मृत्यू; २५ जखमी

Nylon Manja : मकर संक्रातीदरम्यान पंतग उडवण्यासाठी वापरण्यात आलेल्या नायलॉन मांजाने अनेकांच्या आयुष्याचा दोर कापला. नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी असताना देखील अनेक ठिकाणी त्याचा वापर करण्यात आला. याचाच परिणाम राज्यात मांज्यामुळे गळा कापला गेल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला. तर २५ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आता पोलिसांनी राज्यभरामध्ये कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नायलॉन मांजा गळ्याला कापल्यामुळे नाशिक, नंदुरबार आणि अकोला याठिकाणी तिघांनी आपला जीव गमावला. नाशिकमध्ये पाथर्डी गाव चौकाजवळ दुचाकीवरून जाणाऱ्या सोनू धोत्रे (२२ वर्षे) या तरुणाचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला आणि प्रचंड रक्तस्राव झाला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अकोल्यामध्ये एनसीसी ऑफिसजवळून दुचाकीवरून जाणाऱ्या किरण सोनवणे (३५ वर्षे)) हे नायलॉन मांज्यामुळे जखमी झाले. या मांज्यामुळे त्यांचा गळा कापला केला. गळ्याला खोल जखम आणि श्वसन नलिका कापली गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर नंदुरबारमध्ये गळ्याला नायलॉन मांजा कापल्याने कार्तिक गोरवे (७ वर्षे) या मुलाचा मृत्यू झाला.

नागपूरमध्ये एक महिला पोलिस कॉन्स्टेबल दुचाकीवरून ड्युटीवर जात असताना नायलॉन मांजा कापल्यामुळे तिच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. नाशिकच्या लासलगाव-विंचूर रोडवर नायलॉन मांज्यामुळे एक जण गंभीर जखमी झाला. विंचूर येथे बहिणीला भेटण्यासाठी दुचाकीवरून जात असलेल्या १६ वर्षीय मुलाच्या गळ्यात मांजा अडकून तो गंभीर जखमी झाला.

Pune News: रात्रीच पुणे शहर होणार चकाचक, महापालिकेचा नेमका प्लान काय?

वसईमध्ये पत्नी आणि मुलासह रविवारी फिरायला गेलेल्या एका व्यक्तीचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकीवरून जात असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाचा नायलॉन मांज्यामुळे गळा चिरला गेला असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना ३० टाके पडले. छत्रपती संभाजीनगरमध्ये पतंग खेळताना विजेच्या तारेला हात लागल्याने एक मुलगा ७५ टक्के भाजला गेला. भंडाऱ्यामध्ये एका तरूणाचा नायलॉन मांज्यामुळे गळा चिरला.

राज्यभरामध्ये पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करत नायलॉन मांज्याचा साठा जप्त केला. तर अनेक जणांना ताब्यातही घेतलं. या घटनांमुळे नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. नाशिक पोलिस सध्या कारवाई करत आहे. मंगळवारी दिवसभरात नाशिकमध्ये १३ गुन्हे दाखल झाले.

घातक नायलॉन मांजाचा वापर केल्याप्रकरणी ४ पालकांसह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयामध्ये हजर केले असताना त्यांना ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. नाशिक पोलिसांनी १ लाख ८६ हजार रुपये किंमतीचा नायलॉन मांजा जप्त केला.

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply