New Expressway : चाकरमान्यांना लॉटरी! 'मुंबई ते गोवा' अंतर कमी होणार, NHAI कडून नव्या एक्स्प्रेसवेची घोषणा

 

New Expressway In Maharashtra : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच एनएचएआयद्वारे नवा द्रुतगती महामार्ग उभारला जाणार आहे. हा एक्स्प्रेसवे जेएनपीटीजवळच्या पागोटे ते जुन्या पुणे महामार्गावरील चौक जंक्शनपर्यंत असणार आहे. अंदाजे ३० किमी लांब एक्स्प्रेसवे प्रकल्पासाठी ३,७०० कोटी रुपये खर्च येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ३० महिने (साधारण अडीच-तीन वर्ष) इतका कालावधी लागेल असे म्हटले जात आहे.

एनएचएआयचे प्रादेशिक व्यवस्थापक अंशुमाली श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या एक्स्प्रेसवेमुळे एमटीएचएलहून (अटल सेतू) गोव्याला जाणाऱ्या महामार्गापर्यंतचा प्रवास फक्त ३० मिनिटांत पूर्ण होईल. परिणामी मुंबई ते गोवा अंतर अर्ध्या तासाने कमी होणार आहे. हा द्रुतगती महामार्ग उरण-चिरनेक महामार्ग, गोवा महामार्ग आणि पुणे द्रुतगती महामार्ग यांसारख्या महामार्गांना जोडला जाईल. तर पुढे अलिबाग-विरार मल्टीमॉडेल कॉरिडोर, मुरबाड-जुन्नर महामार्ग, नाशिक महामार्ग आणि समृद्धी महामार्ग यांनाही हा नवा द्रुतगती महामार्ग जोडला जाईल अशी माहिती समोर आली आहे.

हा एक्स्प्रेसवे वडोदरा - मुंबई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेसवेशी जोडला जाणार आहे. यामुळे बंदर आणि विमानतळ परिसरात मालवाहतूक सुलभ होईल आणि जेएनपीटी, गोवा, पुणे आणि मुंबई दरम्यानचा प्रवास वेळही कमी होईल. तसेच हा एक्सप्रेसवे अटल सेतूच्या शिवडी टोकावर असलेल्या कोस्टल रोडला आणि वांद्रे-वरळी सी लिंकेला जोडला जाईल. त्याचा विस्तार अलिबाग-विरार मल्टीमॉडल कॉरिडोर, मुरबाड-जुन्नर महामार्ग, समृद्धी द्रुतगती महामार्ग असा होईल. त्याचबरोबर नाशिक महामार्गाला (मोरबे, कर्जत, शेलू, वांगणी, बदलापूर मार्गे) जोडेल.

एनएचएआयद्वारे लवकरच बांधकामाचा कार्यादेश जारी केला जाईल. त्यानंतर बांधकामाच्या नियोजनाला सुरुवात होईल. नव्या एक्स्प्रेसवेच्या कामाला येत्या सात ते आठ महिन्यात सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकल्पामुळे रस्त्यांवरील गर्दीचे प्रमाण कमी होऊन प्रवासाचा वेळ देखील वाचणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply