ED सरकारचं करायचं काय..., जयंत पाटलांच्या समर्थनार्थ राज्यभरात NCP कार्यकर्ते उतरले रस्त्यावर

NCP Protests In Maharashtra : या ED सरकारचं करायचं काय... खाली डाेकं वर पाय... जयंत पाटील साहेब आगे बढाे... हम तुम्हारे साथ है... अशा घाेषणा देत आज (साेमवार) राज्यभरातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे त्यांना बजावलेल्या नाेटीसानूसार आज ते ईडीच्या चौकशीला सामाेरे जाणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर एनसीपीचे कार्यकर्ते त्यांच्या समर्थनार्थ आंदाेलन छेडत आहेत. 

लातूरात आंदाेलन

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ED कडून चौकशी केली जाणार असल्याने लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आलं.

यवतामळात जिल्हाधिका-यांना निवेदन

यवतमाळ येथे देखील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले हाेते. यवतमाळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी ईडी आणि मोदी सरकारचा कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.

नांदेडला एनसीपीचे कार्यकर्ते आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी आंदोलन केले. ईडी आणि भाजप जाणीवपूर्वक आमच्या नेत्याला त्रास देत असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यानी केला. तसेच आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपसह ईडीच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

जयंत पाटील यांचे छायाचित्र असलेले बॅनर झळकवत आम्ही आमच्या नेत्याच्या पाठीशी असल्याचे कार्यकर्त्यांनी नमूद केले. यावेळी धंनजय पाटील (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, नांदेड) यांनी भाजप सरकारचा निषेध नाेंदविला.

सांगलीत रास्ता राेकाे

सांगली येथे राष्ट्रवादी कार्यालय समोर जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी ईडीच्या आणि भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधात बॅनरबाजी केली. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगली मिरज रोडवर रास्ता रोको आंदाेलन केले.

नागपूर - पुणे महामार्ग राेखला

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सिंदखेड राजा शहरात नागपूर - पुणे महामार्ग रोखून रास्ता रोको आंदाेलन केले. यावेळी मोदी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. नाझेर काझी (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी कार्यकर्त्यांसह तहसीलदारांना कारवाईच्या निषेधार्थ निवेदन दिले.

कोल्हापूरात दसरा चाैकात एनसीपीचे आंदोलन

राष्ट्रवादीच्या युवक आघाडीच्या वतीने कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामध्ये जोरदार घोषणाबाजी करत ईडी कारवाईचा विरोध करण्यात आला. यावेळी भाजप आणि ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला आहे. विशेष म्हणजे भर उन्हात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे डोक्यावर खोके घेत आणि हातात लक्षवेधी फलक घेत आंदोलन करत हाेते. महेंद्र चव्हाण (राष्ट्रवादी अध्यक्ष) आणि ऋषिकेश हुंनुरे या कार्यकर्त्यांसह अनेकांनी आंदाेलनात सहभाग नाेंदविला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply