Nashik Cyber Crime : क्रिप्टो करन्सीतून नफ्याचे आमिष दाखवून 24 लाखांना गंडा

Nashik Cyber Crime : क्रिप्टो करन्सीचा ऑनलाइन पार्टटाईम व्यवसाय केल्यास त्यातून जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी एका तरुणाला तब्बल २४ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदित्य मनोहर अहिरराव (रा. कमलनयन सोसायटी, अमृतधाम, पंचवटी) या इंजिनिअर असलेल्या तरुणाच्या फिर्यादीनुसार, तो पुण्यात काम करतो तर, त्याचे वडील सैन्यात कार्यरत होते. 

त्यांच्या निधनामुळे अनुकंपाअंतर्गत तरुणाला सैन्यात नोकरी लागणार होती. तोपर्यंत व्यवसाय करण्याचा त्याचा मानस होता. त्यातूनच २६ ते ३१ ऑगस्ट २०२३ कालावधीत टेलिग्रामवरून संपर्क साधत सायबर भामट्यांनी त्यास ऑनलाइन क्रिप्टो करन्सीच्या व्यवसायाबाबत माहिती दिली. त्यामध्ये गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष त्याने दाखविले होते.

त्यावर विश्वास ठेवून संशयितांनी टप्प्याटप्प्याने तरुणाकडून २४ लाख २५ हजार ५०५ रुपये विविध खात्यांवर ई-स्वरूपात घेतले. त्यानंतरही व्यवसाय सुरू न झाल्याने तसेच अपेक्षित नफा न मिळाल्याने तरुणाने सायबर पोलिसांत धाव घेतली.

तक्रारीच्या तपासाअंती सायबर पोलिसांनी संशयितांवर फसवणुकीसह आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख याप्रकरणी तपास करीत आहेत.

चार लाख गोठविले

तरुणाने सायबर पोलिसांत तक्रार अर्ज दाखल केल्याने पोलिसांनी त्वरित संशयितांची ऑनलाइन माहिती व बँकेच्या खाते क्रमांकावर तांत्रिक माहितीच्या आधारे पुढील कारवाई सुरू केली. त्यानुसार, २४ लाखांपैकी ४ लाख रुपये गोठविणे तपासात शक्य झाले. उर्वरित पैशांच्या परताव्यासाठी पथक प्रयत्नशील असल्याचे पोलिस निरीक्षक रियाज शेख यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply